Quick Reads
कृषिप्रधान महाराष्ट्र (?): शेती मजबूत, संशोधन कमकुवत!
कृषी उत्पादनातील नेतृत्व असूनही संशोधन, शिक्षण आणि धोरणात्मक समर्थनातील आव्हानांचा अभ्यास.
चारुहास दळी । भारत हा कृषिप्रधान देश आहे - आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. भारतामध्ये अजूनही सुमारे निम्म्याच्या जवळपास लोकसंख्या थेट किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहे. तरीही देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात शेतीचा वाटा केवळ काही टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिला आहे. हीच परिस्थिती देशातील कृषी विद्यापीठ आणि कृषी संशोधन संस्थांची आहे. अश्या वेळी एक प्रश्न सतत भेडसावत राहतो, आजही आपण कृषिप्रधान देश आहोत? अलीकडील राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी (NIRF) पाहिली तर कदाचित ह्याचे उत्तर मिळू शकते.
नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेली एक प्रणाली आहे, ज्याद्वारे देशातील उच्च शिक्षण संस्थांना त्यांच्या गुणवत्तेनुसार क्रमवारी (Ranking) दिली जाते. ह्या अहवालानुसार देशातील अव्वल २०० विद्यापीठांच्या यादीत केवळ चार कृषी विद्यापीठांचा समावेश आहे. यापैकी एकही विद्यापीठ महाराष्ट्रातील नाही. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे देशातील अव्वल ५० संशोधन संस्थांमध्ये महाराष्ट्रातील एकही कृषी संशोधन संस्था दिसत नाही. कृषी आणि संलग्न क्षेत्रातील अव्वल संस्थांच्या क्रमवारीतही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व अत्यंत मर्यादित आहे. कृषी क्षेत्रात मोठा वाटा असलेल्या राज्यासाठी ही स्थिती चिंतेची बाब मानावी लागेल.

एनआयआरएफ क्रमवारी प्रक्रियेचा व्यापही लक्षात घेण्यासारखा आहे. २०२५ च्या चक्रात एकूण १४,१६३ संस्थांनी विविध श्रेणींमध्ये या सर्वेक्षणात सहभाग नोंदवला. कृषी आणि संलग्न क्षेत्रांसाठी स्वतंत्र क्रमवारीची श्रेणी तुलनेने अलीकडे, म्हणजे २०२३ पासून सुरू करण्यात आली, जेणेकरून या विशेष क्षेत्रातील संस्थांचे स्वतंत्र मूल्यमापन करता येईल. २०२५ मध्ये या श्रेणीत देशभरातील १७३ संस्थांनी अर्ज केला होता. यापैकी केवळ अव्वल ४० ते ५० संस्थांचीच अंतिम क्रमवारी जाहीर केली जाते. इतक्या मोठ्या सहभागाच्या पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्रातील महाराष्ट्रातील संस्थांची अनुपस्थिती अधिकच विचार करायला भाग पाडणारी ठरते.
या क्रमवारीत अव्वल स्थानांवर देशातील काही मोजक्या प्रतिष्ठित संशोधन व शैक्षणिक संस्थांचे सातत्याने वर्चस्व दिसून येते. नवी दिल्ली येथील इंडियन अॅग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट ने सलग तिसऱ्या वर्षी देशात प्रथम क्रमांक मिळवला असून सर्व क्षेत्रांच्या एकत्रित “ओव्हरऑल” क्रमवारीतही ह्या संस्थेने लक्षणीय २४वे स्थान मिळवले आहे. हरियाणातील कर्नाल येथील आयसीएआर - नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर लुधियाना येथील पंजाब अॅग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी तिसऱ्या, वाराणसी येथील बनारस हिंदू युनिव्हर्सिटी (BHU) चौथ्या, तर इज्जतनगर येथील इंडियन व्हेटरिनरी रिसर्च इन्स्टिट्यूट पाचव्या क्रमांकावर आहेत. या संस्थांची सातत्यपूर्ण उपस्थिती मजबूत संशोधन पायाभूत सुविधा, दीर्घकालीन गुंतवणूक आणि प्रभावी शैक्षणिक परंपरेचे प्रतीक मानली जाते.
कृषी आणि संलग्न क्षेत्रातील संशोधन उत्पादनाकडे पाहिले असता आणखी एक महत्त्वाची बाब समोर येते - संशोधनाचे मोठे प्रमाण अत्यंत मोजक्या संस्थांमध्ये केंद्रित झालेले आहे. या क्षेत्रातील १२६ संशोधन-सक्रिय संस्थांपैकी केवळ चार संस्थांना 'सर्वाधिक उत्पादक' असे वर्गीकृत करण्यात आले असून त्यांनी एकत्रितपणे सुमारे ४,७७० संशोधन प्रकाशने दिली आहेत. याउलट ८२ संस्थांना “कमी उत्पादक” श्रेणीत ठेवण्यात आले आहे, तर १० संस्थांनी मूल्यांकन कालावधीत एकही संशोधन प्रकाशन नोंदवलेले नाही. या पार्श्वभूमीवर IARI ही संस्था केवळ कृषी क्षेत्रातच नव्हे तर नवोपक्रमाच्या दृष्टीनेही उल्लेखनीय ठरते; राष्ट्रीय स्तरावरील 'इनोव्हेशन' श्रेणीत तिला दुसरे स्थान मिळाले आहे. मात्र, या सर्व शैक्षणिक आणि संशोधन योगदान असूनही कृषी विद्यापीठांना अभियांत्रिकी किंवा व्यवस्थापन क्षेत्रातील संस्थांच्या तुलनेत अपेक्षित मान्यता मिळताना दिसत नाही. सहकारी संस्थांकडून आणि उद्योग क्षेत्राकडून मिळणाऱ्या मतांमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा अत्यंत कमी आहे. अकादमिक धारणा केवळ १.५१ टक्के आणि नियोक्ता धारणा अवघी ०.४४ टक्के आहे. हे प्रमाण सर्वसाधारण 'ओव्हरऑल' श्रेणीतील २० टक्क्यांहून अधिक गुणांच्या तुलनेत खूपच कमी असल्याने कृषी शिक्षण संस्थांची सामाजिक आणि व्यावसायिक प्रतिमा अजूनही मर्यादित असल्याचे दिसून येते.
महाराष्ट्र: भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेतील महत्त्वपूर्ण शक्ती
महाराष्ट्र हे भारताच्या कृषी व्यवस्थेमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेले राज्य मानले जाते. पारंपरिक धान्य उत्पादनावर आधारित राज्यांपेक्षा महाराष्ट्राने उच्चमूल्य व्यावसायिक पिके, फळबागायती आणि निर्यातक्षम उत्पादनांमुळे वेगळी ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्र आर्थिक सर्वेक्षण २०२५–२६ नुसार, भारताच्या एकूण कृषी उत्पादनात राज्याचा सुमारे १२.२७ टक्के वाटा असून उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्याच्या सकल राज्य मूल्यवर्धनात (GSVA) कृषी आणि संलग्न क्षेत्रांचा वाटा सुमारे १३.६ टक्के आहे. जरी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सेवा आणि औद्योगिक क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर आधारित असली तरी ग्रामीण भागातील सुमारे ४५.८ टक्के लोकसंख्या थेट किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राची स्थिती राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या आरोग्यावर थेट परिणाम घडवते.
भारताच्या कृषी उत्पादनामध्ये महाराष्ट्राचे योगदान केवळ प्रमाणापुरते मर्यादित नाही, तर अनेक महत्त्वाच्या पिकांमध्ये राज्य अग्रस्थानी आहे. ऊस उत्पादनात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर असून उत्तर प्रदेशाशी त्याची स्पर्धा असते. विशेष म्हणजे सहकारी साखर कारखान्यांच्या मॉडेलमुळे राज्यात साखर पुनर्प्राप्ती दर तुलनेने जास्त आहे.

पारंपरिक बहुपिक पद्धत: ऊस आणि झेंडू लागवड
कापूस उत्पादनातही महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. 'पांढरे सोने' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसामुळे भारतातील वस्त्रोद्योगासाठी आवश्यक कच्चा माल मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतो. डाळींच्या उत्पादनात, विशेषतः तूर (अरहर) पिकामध्ये महाराष्ट्र हे मध्य प्रदेशासह प्रमुख उत्पादक राज्य आहे, ज्यामुळे देशाच्या प्रथिन सुरक्षेत राज्याची महत्त्वाची भूमिका आहे.
तसेच कांदा उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. देशातील सुमारे ३३ ते ४० टक्के कांद्याचे उत्पादन महाराष्ट्रातून होते. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार हा आशियातील सर्वात मोठ्या कांदा बाजारांपैकी एक मानला जातो आणि अनेकदा तो आंतरराष्ट्रीय बाजारभाव ठरविण्यातही प्रभावी ठरतो. याशिवाय सोयाबीन उत्पादनात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असून खाद्यतेल उद्योगासाठी ते महत्त्वाचे कच्चे उत्पादन आहे. ज्वारी आणि बाजरीसारख्या मिलेट पिकांमध्येही महाराष्ट्र अग्रगण्य राज्यांपैकी एक आहे, ज्यामुळे पोषण सुरक्षा आणि कोरडवाहू शेतीच्या दृष्टीने राज्याचे योगदान महत्त्वपूर्ण ठरते.
फळबागायती क्षेत्र: भारताचे 'फ्रूट बास्केट'
महाराष्ट्राने फळबागायती क्षेत्रात विशेष प्रगती केली असून अनेक उच्चमूल्य पिकांमध्ये राज्याने राष्ट्रीय नेतृत्व मिळवले आहे. द्राक्ष उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा ७० टक्क्यांहून अधिक आहे. नाशिक परिसरातील द्राक्ष शेती आणि वाइन उद्योगामुळे भारतातील ९० टक्के वाइन उत्पादन महाराष्ट्रात होते.
कोकण पट्ट्यातील हापूस आंबा हा जागतिक स्तरावर प्रसिद्ध असून अलीकडेच ODOP (One District One Product) उपक्रमांतर्गत त्याला राष्ट्रीय सुवर्ण पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच महाराष्ट्र हा डाळिंब (भगवा जाती) उत्पादनात देशातील सर्वात मोठा उत्पादक आहे. नागपूर परिसरातील मंदारिन संत्र्यांमुळे राज्याला फळ उत्पादनाच्या क्षेत्रात विशेष ओळख मिळाली आहे. या सर्व पिकांमुळे महाराष्ट्र भारताच्या कृषी निर्यातीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो.

बागायती शेती: हापूस आंबा लागवड
वनसंपदा
कृषी क्षेत्राच्या व्यापक संदर्भात महाराष्ट्रातील वनसंपत्तीचे महत्त्वही तितकेच अधोरेखित होते. वन आणि वृक्ष आच्छादन मिळून महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर असून एकूण ६५,३८३ चौ.किमी. हरित क्षेत्र राज्यात आहे. विशेष म्हणजे नोंदणीकृत वनक्षेत्राबाहेरील झाडांचे आच्छादन या बाबतीत महाराष्ट्र सलग तिसऱ्या मूल्यांकनात देशात प्रथम क्रमांकावर आहे. राज्यातील एकूण वृक्ष आच्छादन १४,५२५ चौ.किमी. असून ते भारतातील एकूण वृक्ष आच्छादनाच्या सुमारे १३ टक्के आहे. महाराष्ट्राचे नोंदणीकृत वनक्षेत्र ५०,८५९ चौ.किमी. असून ते राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे १६.५ टक्के आहे आणि भारताच्या एकूण वनक्षेत्रात राज्याचा सुमारे ७.१ टक्के वाटा आहे. कोकण किनारपट्टीवरील ३१५ चौ.किमी. मॅन्ग्रोव्ह क्षेत्र राज्याच्या जैवविविधतेसाठी महत्त्वपूर्ण असून त्यात सातत्याने वाढ होत आहे. याशिवाय विदर्भातील बांबू संपत्ती, सह्याद्री पर्वतरांगांतील जैवविविधता, तसेच वाघांच्या संवर्धनात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यामुळे कृषी, पर्यावरणीय संतुलन आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर राज्याची वनसंपत्ती ही एक महत्त्वाची नैसर्गिक भांडवल म्हणून पाहिली जाते.

कृषी-वनिकी शेती नमुना: हळद आणि बांबू लागवड
संलग्न क्षेत्रे आणि कृषी निर्यात
कृषी संलग्न क्षेत्रांमध्येही महाराष्ट्राचे योगदान लक्षणीय आहे. भारताच्या एकूण कृषी निर्यातीत राज्याचा वाटा सुमारे १५.४ टक्के आहे. विशेषतः ताजी फळे, भाजीपाला आणि प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांच्या निर्यातीमध्ये महाराष्ट्र अग्रस्थानी आहे.
पशुधन क्षेत्रात महाराष्ट्र दुध उत्पादनात पाचव्या क्रमांकावर असून देशाच्या एकूण दूध उत्पादनात सुमारे ६.७ टक्के वाटा आहे. मांस उत्पादनात राज्य तिसऱ्या क्रमांकावर असून राष्ट्रीय उत्पादनात सुमारे ११.३ टक्के योगदान आहे. मत्स्य व्यवसायातही महाराष्ट्र महत्त्वाचा समुद्री मासे उत्पादक राज्य आहे. मुंबईतील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन (CIFE) सारख्या संस्थांमुळे या क्षेत्राला संशोधन आणि तांत्रिक आधार मिळतो.
अलीकडील काळात महाराष्ट्राने कृषी नवोपक्रम आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. जानेवारी २०२५ पर्यंत भारतातील मान्यताप्राप्त स्टार्टअप्सपैकी सुमारे २४ टक्के स्टार्टअप्स महाराष्ट्रात आहेत, ज्यापैकी अनेक कृषी क्षेत्राशी संबंधित आहेत. प्रिसिजन फार्मिंग, पुरवठा साखळी व्यवस्थापन आणि फिनटेक सेवा या क्षेत्रांत अनेक नवीन उपक्रम उदयास येत आहेत.
महाराष्ट्रात फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स (FPOs) ची संख्या देशात सर्वाधिक आहे.
तसेच राज्यात फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स (FPOs) ची संख्या देशात सर्वाधिक आहे. या संस्थांमुळे शेतकऱ्यांना सामूहिक विपणन, थेट बाजारपेठेपर्यंत पोहोच आणि अधिक चांगली सौदेबाजी करण्याची क्षमता मिळते.
उच्चमूल्य फळबागायती, व्यावसायिक पिके, वनउपज, कृषी निर्यात आणि नवोपक्रम यांच्या आधारे महाराष्ट्राला भारतीय कृषी अर्थव्यवस्थेचे 'व्हॅल्यू इंजिन' असेही म्हणता येईल. राज्याची कृषी व्यवस्था केवळ अन्न उत्पादनापुरती मर्यादित नसून ती ग्रामीण अर्थव्यवस्था, उद्योग आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यांच्याशी जोडलेली आहे.
गरजू महाराष्ट्र माझा!
महाराष्ट्राच्या कृषी उत्पादनातील नेतृत्व, फळबागायतीतील प्रगती, निर्यातक्षम पिके आणि समृद्ध वनसंपत्ती यांचा विचार केला तर राज्याचे कृषी क्षेत्र राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे स्पष्ट होते. तथापि, या सर्व सामर्थ्याच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. इतके मोठे कृषी योगदान असूनही कृषी शिक्षण, संशोधन आणि ज्ञाननिर्मितीच्या राष्ट्रीय क्रमवारीत महाराष्ट्रातील संस्थांचे प्रतिनिधित्व मर्यादित का दिसते? हा विरोधाभास केवळ शैक्षणिक क्षेत्रापुरता मर्यादित नाही; तो राज्यातील शेतीच्या मूलभूत संरचनात्मक आव्हानांकडेही निर्देश करतो.
महाराष्ट्रातील शेतीसमोरील आव्हानांपैकी सर्वात गंभीर आणि वेदनादायी प्रश्न म्हणजे शेतकरी आत्महत्यांचा आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा या भागांमध्ये गेल्या दोन दशकांपासून हा प्रश्न सातत्याने समोर येत आहे. उत्पादन खर्चातील वाढ, कर्जबाजारीपणा, बाजारभावातील अनिश्चितता आणि पिकांचे अपयश या घटकांच्या एकत्रित परिणामामुळे अनेक शेतकरी आर्थिक आणि मानसिक तणावाखाली येतात. ही परिस्थिती केवळ आर्थिक प्रश्न नसून सामाजिक आणि मानवी दृष्टीनेही गंभीर आहे. त्यामुळे शेतकरी कल्याण, उत्पन्न स्थैर्य आणि जोखीम व्यवस्थापन या बाबींवर अधिक लक्ष देणे अत्यावश्यक ठरते.
याशिवाय महाराष्ट्रातील शेतीचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जमिनीचे वाढते तुकडीकरण. राज्यातील बहुसंख्य शेतकरी लहान आणि अल्पभूधारक गटात मोडतात. जमिनीचे क्षेत्रफळ कमी असल्यामुळे यांत्रिकीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे अनेकदा कठीण ठरते. परिणामी उत्पादनक्षमता वाढवणे आणि शेतीतून स्थिर उत्पन्न मिळवणे हे आव्हानात्मक बनते. लहान शेतकऱ्यांसाठी सामूहिक शेती, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPOs) आणि बाजाराशी थेट जोडणी यांसारख्या उपाययोजना अधिक महत्त्वाच्या ठरतात.

अवकाळी पाऊस: सद्यपरिस्थितीतिल महत्वाच्या आव्हानांपैकी एक
महाराष्ट्रातील शेती मोठ्या प्रमाणावर कोरडवाहू स्वरूपाची आहे, हेही या क्षेत्रातील एक मूलभूत वास्तव आहे. राज्यातील सुमारे निम्म्याहून अधिक शेती पावसावर अवलंबून आहे. अनियमित आणि बदलत्या पावसामुळे पिकांचे उत्पादन अनेकदा अनिश्चित होते. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर ही अनिश्चितता आणखी वाढत आहे. त्यामुळे जलसंधारण, सूक्ष्म सिंचन, दुष्काळसहिष्णू पिके आणि हवामान-समर्थ शेती पद्धती यांचे महत्त्व अधिक वाढले आहे.
तसेच महाराष्ट्रातील विविध प्रदेशांमध्ये कृषी विकासात स्पष्ट प्रादेशिक असमतोल दिसून येतो. कोकण पट्ट्यात फळबागायती आणि उच्च मूल्य पिकांचे प्रमाण जास्त असताना, विदर्भ आणि मराठवाडा या भागांमध्ये कोरडवाहू शेती, पाण्याची टंचाई आणि उत्पादनातील अनिश्चितता अधिक आढळते. या प्रादेशिक फरकांमुळे कृषी धोरणे आखताना स्थानिक भौगोलिक, हवामानिक आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेणे आवश्यक ठरते. प्रत्येक प्रदेशासाठी वेगवेगळ्या कृषी तंत्रज्ञान आणि धोरणात्मक उपायांची गरज आहे.
बदल अपरिहार्य आहे
महाराष्ट्रातील शेतीचे सामर्थ्य आणि त्यासमोरील आव्हाने यांचा विचार केल्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा स्पष्टपणे समोर येतो. कृषी क्षेत्राच्या शाश्वत प्रगतीसाठी सतत संशोधन, शिक्षण आणि तांत्रिक नवोपक्रम अत्यावश्यक आहेत. बदलते हवामान, मातीची घटणारी सुपीकता, पाण्याची मर्यादित उपलब्धता आणि बाजारातील वाढती स्पर्धा या परिस्थितीत पारंपरिक शेती पद्धतींवर अवलंबून राहणे पुरेसे ठरत नाही. त्यामुळे कृषी व्यवस्थेचे सातत्याने वैज्ञानिक निरीक्षण, पिक पद्धतींचे मूल्यांकन आणि नव्या तंत्रज्ञानाचा विकास ही काळाची गरज बनली आहे.
पिक उत्पादन सुधारण्यासाठी सातत्यपूर्ण संशोधनाचे महत्त्व विशेष अधोरेखित होते. मातीतील पोषणद्रव्यांचा समतोल, कीड व रोग व्यवस्थापन, हवामान बदलाशी सुसंगत पिकांचे वाण, तसेच पाण्याचा कार्यक्षम वापर यांसारख्या अनेक घटकांवर वैज्ञानिक अभ्यास आवश्यक असतो. संशोधन संस्थांकडून विकसित होणारी सुधारित बियाणे, अचूक कृषी तंत्रज्ञान, हवामान आधारित सल्ला प्रणाली आणि डिजिटल कृषी सेवा यांमुळे शेतकऱ्यांना अधिक स्थिर आणि शाश्वत उत्पादन मिळू शकते.
महाराष्ट्राचे कृषी क्षेत्र समजून घेताना राज्यातील समृद्ध नैसर्गिक संसाधनांचाही विचार करणे आवश्यक ठरते.
या संदर्भात पिक पद्धतींमधील विविधतेचे महत्त्वही अधोरेखित होते. एकाच पिकावर दीर्घकाळ अवलंबून राहणारी मोनोकल्चर पद्धत मातीची सुपीकता कमी करणे, कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढवणे आणि आर्थिक जोखीम वाढवणे यांस कारणीभूत ठरू शकते. याउलट बहुपिक पद्धती, पीक फेरपालट आणि मिश्रपीक प्रणालीमुळे मातीतील पोषण संतुलन राखले जाते, कीड-रोग नियंत्रणास मदत होते आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न अधिक स्थिर राहते. त्यामुळे विविध पिकांवर आधारित कृषी प्रणाली ही भविष्यातील शाश्वत शेतीसाठी महत्त्वाची ठरते.
तसेच आधुनिक कृषी विकासात स्थानिक पारंपरिक ज्ञानाची भूमिका दुर्लक्षित करता येत नाही. अनेक पिढ्यांच्या अनुभवातून विकसित झालेले स्थानिक ज्ञान हवामान, माती आणि स्थानिक परिसंस्थेशी सुसंगत असते. या ज्ञानाचे आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी एकत्रीकरण केल्यास अधिक परिणामकारक कृषी उपाय विकसित करता येतात. त्यामुळे कृषी संशोधनात शेतकऱ्यांचा अनुभव, स्थानिक पिकांची परंपरा आणि वैज्ञानिक तंत्रज्ञान यांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे.
महाराष्ट्राचे कृषी क्षेत्र समजून घेताना राज्यातील समृद्ध नैसर्गिक संसाधनांचाही विचार करणे आवश्यक ठरते. सह्याद्री पर्वतरांगांपासून ते कोकण किनारपट्टीपर्यंत पसरलेले विविध भौगोलिक प्रदेश महाराष्ट्राला अनोखी जैवविविधता प्रदान करतात. पश्चिम घाट हा जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त जैवविविधता हॉटस्पॉट असून येथे अनेक दुर्मीळ वनस्पती, औषधी वनस्पती आणि स्थानिक प्रजाती आढळतात. राज्यातील विस्तीर्ण वनक्षेत्र केवळ पर्यावरणीय संतुलन राखण्यातच नव्हे तर मृदसंरक्षण, जलसंधारण आणि हवामान नियमनातही महत्त्वाची भूमिका बजावते. कोकण किनारपट्टीवरील मॅन्ग्रोव्ह परिसंस्था, समुद्री जैवविविधता आणि मत्स्यसंपदा या राज्याच्या अर्थव्यवस्थेला महत्त्वपूर्ण आधार देतात. त्याचप्रमाणे गोदावरी, कृष्णा, तापी आणि भीमा यांसारख्या प्रमुख नदीखोऱ्यांमुळे गोड्या पाण्यातील जैवविविधता आणि सिंचनासाठी आवश्यक जलस्रोत उपलब्ध होतात.

प्रातिनिधिक फोटो
याशिवाय महाराष्ट्राची औद्योगिक आणि सेवा क्षेत्रातील प्रगतीही कृषी विकासासाठी पूरक ठरू शकते. राज्यातील विकसित औद्योगिक पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, प्रक्रिया उद्योग आणि निर्यात केंद्रे यांमुळे कृषी उत्पादनांच्या पोस्ट-हार्वेस्ट व्यवस्थापनात मोठी संधी निर्माण होते. अन्नप्रक्रिया उद्योग, शीतसाखळी व्यवस्था, लॉजिस्टिक्स नेटवर्क आणि कृषी निर्यात केंद्रे यांचा प्रभावी वापर केल्यास शेतमालाचे मूल्यवर्धन करता येते आणि शेतकऱ्यांना अधिक चांगला बाजारभाव मिळू शकतो. या दृष्टीने महाराष्ट्र आधीच अनेक बाबतीत मजबूत पायाभूत सुविधांसह “अर्ध्या वाटेवर” पोहोचलेले राज्य असल्याचे म्हणता येईल.
मात्र या सर्व संभाव्यतेचा पूर्ण लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अधिक मजबूत संस्थात्मक आधाराची गरज आहे. कृषी क्षेत्रातील संशोधन आणि विकास यासाठी शासनाची सक्रिय भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. आधुनिक प्रयोगशाळा, अत्याधुनिक संशोधन सुविधा, प्रशिक्षित आणि उत्साही युवा वैज्ञानिक तसेच कुशल तांत्रिक मनुष्यबळ या घटकांची उपलब्धता वाढवणे आवश्यक आहे. यासोबतच कृषी विस्तार सेवेची प्रभावी अंमलबजावणी करून संशोधनातून निर्माण होणारे तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
विशेष म्हणजे या प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचा अनुभव, स्थानिक परिस्थितीचे ज्ञान आणि वैज्ञानिक संशोधन यांचा समन्वय साधल्यास अधिक परिणामकारक आणि व्यवहार्य उपाय विकसित होऊ शकतात. शासन, कृषी विद्यापीठे, संशोधन संस्था आणि शेतकरी यांच्यातील सहकार्य मजबूत केल्यास महाराष्ट्रातील शेती अधिक शाश्वत, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनू शकते.
इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो
वरील सर्व आकडेवारी आणि वास्तव परिस्थिती पाहता एक गोष्ट स्पष्ट होते. अनेक अडचणी असूनही शेतकरी आपल्या परीने अधिक उत्पादन मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. बदलत्या हवामानाशी जुळवून घेणे, नवीन पिकपद्धती स्वीकारणे आणि बाजारातील चढउतारांमध्ये टिकून राहणे यासाठी ते सातत्याने मेहनत घेत आहेत. मात्र केवळ शेतकऱ्यांच्या प्रयत्नांवरच या परिस्थितीत सुधारणा होणे शक्य नाही. हवामान बदलामुळे वाढणारे जोखीम, पाण्याची अनिश्चित उपलब्धता, तसेच अधिक उत्पादनक्षम आणि शाश्वत तंत्रज्ञानाची गरज ही मोठी आव्हाने पुढे उभी आहेत. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठे आणि संशोधन संस्थांकडून अधिक भक्कम वैज्ञानिक आधार, स्थानिक पिकांवर संशोधन, तंत्रज्ञान विकास आणि विस्तार सेवा मिळणे अत्यंत आवश्यक आहे.
महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यासाठी ही परिस्थिती गंभीर आहे. कारण राज्याच्या अर्थव्यवस्थेत शेतीचा मोठा वाटा आहे, तसेच लाखो कुटुंबांचे जीवन त्यावर अवलंबून आहे. दुसरीकडे, शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण, उत्पादन खर्चातील वाढ आणि हवामान बदलाचे परिणाम यांसारख्या समस्या अधिक तीव्र होत आहेत.
भारत आणि महाराष्ट्र अजूनही कृषिप्रधान समाज आहेत, पण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने शेतीचे स्थान कमकुवत होत चालले आहे. जर कृषी संशोधन, शिक्षण आणि तंत्रज्ञानावर योग्य गुंतवणूक झाली नाही तर शेतीवर अवलंबून असलेल्या कोट्यवधी लोकांचे भविष्य अधिक असुरक्षित होऊ शकते. त्यामुळे कृषी क्षेत्राला केवळ परंपरेचा वारसा म्हणून नव्हे तर भविष्यातील विकासाचा केंद्रबिंदू म्हणून पाहणे आवश्यक आहे.
चारुहास दळी चेक रिपब्लिकच्या मेंडेल विद्यापीठात संशोधक आहेत.
