Europe

जीव वाचवण्यासाठीचे जीवघेणे प्रवास: भूमध्य सागरातील निर्वासितांची व्यथा

ग्रीसच्या दक्षिण किनारपट्टीजवळ भूमध्य समुद्रात बुधवारी निर्वासितांनी खचाखच भरलेली नाव बुडाल्यानं किमान ७८ जणांचा मृत्यू झाला.

Credit : इंडी जर्नल

 

ग्रीसच्या दक्षिण किनारपट्टीजवळ भूमध्य समुद्रात बुधवारी निर्वासितांनी खचाखच भरलेली नाव बुडाल्यानं किमान ७८ जणांचा मृत्यू झाला. आणखी शेकडो लोक अजूनही बेपत्ता असल्यानं मृतांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. जवळपास तीनच महिन्यांपूर्वी इटलीच्या किनाऱ्याजवळ अशाच प्रकारची घटना घडून ६०हुन अधिक निर्वासितांनी जीव गमावला होता. या नवीन घटनेनं भूमध्य सागरातून जीवघेणा प्रवास करत युरोपमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्या निर्वासितांचा भीषण प्रश्न आणि त्यांची हतबलता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

या वर्षाच्या सुरवातीपासून, मात्र सहा महिन्यांच्या काळातील आकडेवारीनुसार, मध्य भूमध्य सागरी मार्गावरून प्रवास करणारे १,०३९ निर्वासित बेपत्ता आहेत. निर्वासितांना लिबिया किंवा ट्युनिशियाहुन युरोपमध्ये घेऊन जाणारा भूमध्य समुद्रातील मध्य समुद्री मार्ग हा निर्वासितांच्या प्रवासासाठीचा सर्वाधिक जीवघेणा मार्ग म्हणून ओळखला जातो. संयुक्त राष्ट्रसंघानुसार या मार्गावर २०१४ पासून जवळपास २०,०००हुन अधिक निर्वासितांचे मृत्यू नोंदवले गेले आहेत.

आफ्रिकी आणि आखाती देशांमधून युरोपला जाण्याचा प्रयत्न करणारे निर्वासित भूमध्य सागरी मार्ग अवलंबतात. या देशांमधून अनेक लोक युद्ध, गृहयुद्ध, वंशवादी हिंसाचार, नैसर्गिक आपत्ती, अशा अनेक कारणांमुळं पलायन करून युरोपियन देशांमध्ये आश्रय घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र या गरीब देशांमधून येणाऱ्या बहुतांश निर्वासितांकडं वैध मार्गानं या विकसित देशांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी लागणारी संसाधनं नसतात. हिंसाचारापासून पलायन करणाऱ्या अनेकांकडं हा पर्यायच नसतो. त्यामुळं आयुष्यभरात जमवलेली सर्व जमापुंजी खर्च करून अवैध मार्गानं युरोपियन युनियनमधील देशांमध्ये प्रवेश मिळवून आश्रय मागणं, हा एकच पर्याय त्यांच्यासमोर असतो. आणि यामधूनच सुरु होतो समुद्रमार्गे प्रवास, जो अनेकांसाठी जीवघेणा ठरतो.

२०१५ साली एलन कुर्दी या दोन वर्षीय मुलाचा तुर्कीयेच्या समुद्र किनाऱ्यावरील एका फोटोनं आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधून घेतलं. एलन अन त्याचे कुटुंबीय सीरियामधील गृहयुद्धापासून जीव वाचवून कॅनडाला त्यांच्या नातेवाईकांकडं जाण्याचा प्रयत्न करत होते. कॅनडानं आश्रय नाकारल्यानं त्यांनी तुर्कीयेहून सागरी मार्गानं प्रवास करत युरोप गाठायचं ठरवलं. मात्र तुर्कीयेच्या किनाऱ्यावरून निघाल्यानंतर पाचच मिनटात त्यांची बोट उलटली आणि एलन, त्याचा भाऊ आणि त्याची आई यांचा बुडून मृत्यू झाला. एलनच्या वडिलांनी या दुर्घटनेनंतर दिलेल्या माहितीनुसार नौकेवर चांगल्या दर्जाची सुरक्षा जॅकेट्सदेखील उपलब्ध नव्हती.

 

 

एलनच्या समुद्रावर वाहून आलेल्या मृतदेहाच्या, तुर्कीयेच्या पत्रकार निलुफर देमीर यांनी काढलेल्या फोटोनं संपूर्ण जगाचं लक्ष निर्वासितांच्या समस्येकडं वेधलं. विविध देशाच्या नेत्यांनी निर्वासितांच्या प्रश्नावर खेद व्यक्त केला. तुर्कीयेनं या अवैध नौका प्रवासासाठी कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाई केली. कॅनडामध्ये तत्कालीन निवडणूक प्रचारातही निर्वासितांचा मुद्दा गाजला. निर्वासितांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्थांवर २०१५ साली त्यांना आलेल्या देणग्यांमध्ये अनेक पटींनी वाढ झाली.

मात्र या सगळ्यानंतर निर्वासितांचा प्रश्नावर सकारात्मक चर्चा सुरु झाली का? भूमध्य सागरातून जीवघेणा प्रवास करणाऱ्या आणि त्यातून मृत्युमुखी पडणाऱ्या किंवा बेपत्ता होणाऱ्या निर्वासितांची संख्या पाहता हे चित्र फारसं बदललेलं दिसत नाही.

 

बुधवारी झालेल्या बोट दुर्घटनेत नक्की काय झालं?

आलेल्या वृत्तांनुसार ग्रीसजवळ भूमध्य सागरात बुडालेल्या या नावेत तिच्या क्षमतेच्या बरीच जास्त, म्हणजे जवळपास ७५० लोकं तरी असल्याचं कळतं. यात १०० लहान मुलंदेखील होती. बोटीची परिस्थिती आणि त्यावरील माणसांची गर्दी बघून मंगळवारी या बोटीला संपर्क साधून त्यावरील लोकांना मदत करण्याची तयारी दर्शवल्याचं ग्रीक तटरक्षक दलानं सांगितलं. मात्र नावेच्या कप्तानानं ही मदत नाकारली आणि नाव पुढं इटलीला न्यायचा आग्रह केला. ही मदत नाकारण्यामागेही ग्रीसची दिवसेंदिवस अधिकाधिक निर्वासित-विरोधी म्हणून समोर येणारं जाचक धोरणच कारणीभूत असल्याचं म्हटलं जातंय.

अनेक निर्वासितांच्या बोटी ग्रीसला टाळून पुढं इटलीला पोहोचण्याच्या प्रयत्नात असतात. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे गेल्या अनेक महिन्यांत ग्रीक तटरक्षक दलानं या भागात गस्त वाढवली आहे. याचबरोबर ग्रीकी अधिकाऱ्यांना सापडलेल्या निर्वासितांना पकडून त्यांना अवैधरित्या तुर्कीयेमध्ये सोडण्याचं प्रमाणही वाढल्याचं म्हटलं जातं. ग्रीसनं वेळोवेळी हे नाकारलं असलं तरी न्यू यॉर्क टाइम्सनं नुकत्याच समोर आणलेल्या एका व्हिडिओ आणि वृत्तानं ग्रीसचं हे सत्य जगासमोर आणलं.

न्यू यॉर्क टाइम्सच्या ब्रसेल्सच्या ब्युरो चिफ मटिना स्टेव्हिस-ग्रिडनेफ यांना काही आठवड्यांपूर्वी एक व्हिडियो पाठवण्यात आला. न्यू यॉर्क टाइम्सच्या पॉडकास्टमध्ये त्यांनी याविषयी दिलेल्या माहितीनुसार या व्हिडीयोमध्ये ग्रीसच्या लेसबॉस किनाऱ्यावरून काही निर्वासितांना ग्रीक तटरक्षकांकडून समुद्राच्या मध्यात तरंगणाऱ्या एका तराफ्यावर सोडण्यात आल्याचं त्यांना दिसलं. त्यांच्या शरीररचनेवरून ते आफ्रिकी असल्याचं कळून यात होतं आणि त्यांच्या काही लहान मुलंही होती. हा तराफा नंतर तुर्कीयेच्या समुद्राच्या हद्दीत जाऊन पोहोचला.

 

 

मध्य पूर्व, आशियायी आणि आफ्रिकी देशांमधून येणारे बहुतांश निर्वासित तुर्कीयेमार्गे ग्रीसला पोहोचतात. युरोपियन युनियनच्या नियमांनुसार सदस्य देशांना त्यांच्या जमिनीवर आश्रय मागणाऱ्या निर्वासितांना मदत करणं क्रमप्राप्त आहे. त्यामुळं तुर्कीयेहुन ग्रीसमध्ये येण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या निर्वासितांना तसंच परत पाठवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हटलं जातं, जेणेकरून युरोपियन युनियनचं सदस्य नसलेलं तुर्कीये सरकार त्यांना आश्रय नाकारून परतवण्याचं काम करेल. फक्त ग्रीसच नाही, तर एकूणच युरोपियन युनियनमधील अनेक देश ग्रीसमधूनच निर्वासितांना परतवण्यासाठी तुर्कीयेचा वापर करत असल्याचा आरोप काही आंतरराष्ट्रीय संस्थांनी केला आहे.

या कारणामुळं अनेक निर्वासित बोटींचा मध्य भूमध्य सागरी मार्गावरून ग्रीसऐवजी सरळ इटलीच्या दिशेनं  जाण्याकडं कल असतो. निर्वासितांना पुढं उत्तर युरोपमध्ये जाण्याचा प्रवास ग्रीसपेक्षा इटलीमधून करणंही जास्त सुकर ठरतं. मात्र समुद्रासाठी अकार्यक्षम असलेल्या नौकांमधून, सुरक्षा जॅकेट्सशिवाय प्रवास करणं अत्यंत जोखमीचं असतं. अनेकदा या नौका त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त भरलेल्या असतात. बुडण्यासोबतच खाण्यापिण्याचे हाल होऊन किंवा आजारपणानेही या नौकांवर निर्वासितांचे मृत्यू झाल्याच्या नोंदी आहेत. याव्यतिरिक्त अनेक जणांचा त्यांची नाव बुडाल्यानंतर किंवा किनाऱ्याला पोहोचल्यानंतर काही ठावठिकाणा न कळल्यानं त्यांची बेपत्ता म्हणूनही नोंद होते.

तीन महिन्यांपूर्वी तुर्कीयेहुन इटालीकडं जवळपास २०० लोकांना घेऊन जाणारी एक छोटी लाकडी नाव बुडाल्यानंतर किमान ६७ जणांचा मृत्यू झाला होता तर त्यातील अनेक जण अजूनही बेपत्ता आहेत. या दुर्घटनेत एका पाकिस्तानी व्यावसायिक हॉकी खेळाडूचाही मृत्यू झाला, जी तिच्या तीन वर्षाच्या मुलाच्या औषधोपचारासाठी इटलीला पोहोचण्याच्या प्रयत्नात होती.

 

 

अशा प्रकारच्या घटना भूमध्य सागराच्या किनाऱ्यावरील युरोपियन देशांसाठी आता नित्याच्याच झाल्या आहेत. भूमध्य सागराच्या फक्त मध्य मार्गावर नाही तर पूर्व आणि पश्चिम मार्गावरूनही अनेक निर्वासितांच्या नौकांबरोबर अशा दुर्घटना घडतात. याव्यतिरिक्त तस्कर अनेक नवीन आणि अधिक असुरक्षित मार्गांनी निर्वासितांना युरोपियन देशांमध्ये पोहचवण्याच्या प्रयत्नात असतात.

 

युरोप आणि निर्वासित धोरणं

युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध झाल्यानंतर देश सोडावा लागणाऱ्या अनेक युक्रेनियन नागरिकांसाठी त्यांची शेजारी राष्ट्रं असलेल्या पोलंड, हंगेरी आणि इतर पूर्व युरोपियन देशांनी दारं उघडली. मात्र हीच राष्ट्रं वेळोवेळी इतर कोणत्याही निर्वासितांना सामावून घेण्यासाठी नकारघंटाच वाजवत आली आहेत. ‘आमच्यासारख्याच दिसणाऱ्या लोकांच्या देशात युद्ध सुरु आहे आणि त्यांना बेघर व्हावं लागतंय हे अतिशय हृदयद्रावक आहे’, अशा प्रतिक्रिया युद्ध सुरु झाल्यानंतर या देशांमधून आलेल्या आपण बघितल्या होत्या. त्यामुळं निश्चितच निर्वासितांचा वंश त्यांना आश्रय देण्यात किती महत्त्वाचा आहे हे अधोरेखित होतं. २०१९ मध्ये भारतानं आणलेल्या नागरिकत्व कायद्यालाही अशाच प्रकारच्या धार्मिक रंगामुळं टीकेला सामोरं जावं लागलं होतं.

जवळपास आठ वर्षांपूर्वी सीरियामध्ये गृहयुद्ध पेटल्यानंतर तिथून येणाऱ्या निर्वासितांच्या लोंढ्यांमुळं युरोपियन युनियनला निर्वासितांचं नियोजन करणं कठीण होऊन बसलं. त्यात युरोपियन युनियनमधील काही देशांच्या निर्वासित-विरोधी धोरणांमुळं इतर देशांनी अनेकदा त्यांच्यावर निर्वासितांचा अतिरिक्त भार येत असल्याचं बोलून दाखवलं आहे. यामुळं अनेक देशांतील पुराणमतवादी राजकीय पक्ष निर्वासित-विरोधी भूमिका घेतानाही आपल्याला दिसतात. इटलीमध्ये गेल्यावर्षी जॉर्जिया मेलोनी यांचं उजवं सरकार निवडून आल्यापासून इटलीच्या निर्वासित धोरणावरही संकट उभं ठाकलं आहे. याव्यतिरिक्त युरोपनं निर्वासितांचा प्रवाह युरोपला पोहोचण्यापूर्वीच रोखण्यासाठी लिबिया आणि काही उत्तर आफ्रिकी देशांच्या तटरक्षक दलांची मदत घेतल्याचं काही मानवाधिकार संस्थांनी म्हटलं आहे. या परिस्थितीत आश्रय देणाऱ्या देशांची संख्या जर कमी होत राहिली, तर जोखमीचा प्रवास करणाऱ्या निर्वासितांची संख्या आणखी वाढतच जाणार आहे.

युरोपियन युनियनच्या नुकत्याच झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत अनेक सदस्य देशांनी निर्वासित प्रश्नावर एकत्र काम करण्याचा ठराव केल्याचं वृत्त आहे. मात्र या ठरावाचे तपशील अजून समोर आले नाहीत.

यावर्षी आत्तापर्यंत जवळपास ७०,००० निर्वासित आणि स्थलांतरित वेगवेगळ्या मार्गांनी युरोपला पोहोचले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीनुसार त्यातील बहुतांश जणांनी इटलीमार्गे युरोपमध्ये प्रवेश के. उत्तर आफ्रिकेतील दुष्काळ, अनेक आफ्रिकी देशांतील अंतर्गत हिंसाचार, आखाती देशांतील गृहयुद्धं, हवामान बदलामुळं होणारी विस्थापनं, यामुळं ही संख्या येत्या काळात वाढतच जाणार आहेत. युरोप आणि इतर देशांची धोरणं निर्वासितांसाठी अधिकाधिक समावेशक झाली नाही, तर जीव वाचवण्यासाठी स्वदेशातून बाहेर पडणाऱ्या पण जोखमीचा प्रवास करून जीव गमावणाऱ्या निर्वासितांची संख्याही अशीच वाढत जाणार.