Opinion

वॉशिंग्टनची कुऱ्हाड!

मीडिया लाईन सदर

Credit : इंडी जर्नल

 

इसरायलने इराणच्या सगळ्यात बड्या  गॅसक्षेत्राला लक्ष केल्यामुळे चिडलेल्या इराणने संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएई, कतार आणि सौदी अरेबियामधील महत्त्वाच्या तेल आणि नैसर्गिक गॅस केंद्रांवर जबरदस्त हल्ले चढवले. त्यामुळे तेलाचे भाव प्रतिपंप ११४ डॉलरच्या पुढे गेले असून, संपूर्ण जगावर ऊर्जा संकट  ओढवले आहे. इराणमधील साउथ पार्स नैसर्गिक गॅस क्षेत्र हे त्या देशातील गॅस उत्पादनाचे अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. इराणने कतारमधील ज्या रास लाफन इंडस्ट्रियल सिटीवर क्षेपणास्त्रे डागली, ते तर जगातील सर्वात मोठे गॅस हब आहे. सौदी अरेबियामधील ‘सम्रेफ रिफायनरी’, त्याचप्रमाणे कुवेतमधील एका अन्य रिफायनरीवर मोठा हल्ला चढवण्यात आला आहे. यामुळे जागतिक इंधनपुरवठ्यावर अत्यंत प्रतिकूल परिणाम होणार आहे. अगोदरच होर्मुझ सामुद्रधुनीमधील वाहतूक कमी झाल्यामुळे जागतिक पुरवठा साखळीला फटका बसला आहे. यामुळे केवळ इसरायलचेच नव्हे, तर अमेरिकेचेही धाबे दणाणले आहे. म्हणूनच त्यामुळे साउथ पार्सवरील इसरायली हल्ल्याची आम्हाला पूर्वकल्पनास नव्हती, असे म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढे इसरायलने अशा प्रकारचे हल्ले करू नयेत, असे ट्रम्प यांनी जाहीरपणे बजावले आहे.

जगातील शेअर बाजार, कमॉडिटी बाजार कोसळले आहेत. अमेरिकेत गॅसोलिनचे भाव महिन्याभरात गॅलनला एक डॉलरने वाढले असून, ते आता प्रत्येक गॅलनमागे ३.८८४ वर गेले आहेत युरोपमधील नैसर्गिक गॅसच्या किमती आकाशाला भिडलेल्या असून, याची झळ भारतालाही पोहोचणार आहे. भारत जे कच्चे तेल आयात करतो त्याची किंमत  मार्च महिन्यामध्ये सरासरी ११४ डॉलरवर गेली आहे. यापूर्वी, म्हणजेच फेब्रुवारीत ती ६९ डॉलर होती. भारताची २२ जहाजे इराणी आखातात अडकून पडली आहेत. त्यामध्ये ३.२ लाख टन एलपीजी, दोन लाख टन एलएनजी आणि १६ लाख टन कच्चे तेल आहे. उद्या कच्चे तेल बॅरलला १३० डॉलरपर्यंत गेले आणि हे भाव दोन ते तीन महिने तसेच राहिले, तर भारताचे जीडीपी घसरून ६.४ टक्क्यांवर ये ईल. महागाई साडेपाच टक्क्यांवर आणि वित्तीय तूट ५.६ टक्क्यांवर जाईल, असा अंदाज आहे. त्याचप्रमाणे चालू खात्यावरील तू.ट ३.२ टक्क्यांवर जाऊ शकेल.

 

अमेरिकेच्या ‘नॅशनल काउंटर टेररिझम सेंटर’चे संचालक जो केंट यांनी इराणपासून कोणताही तात्काळ धोका नसल्याचे सांगत युद्धाला विरोध केला होता.

 

कतारवरील इराणच्या हल्ल्यामुळे त्या देशाची एलएनजीच्या निर्यातीची १७ टक्के क्षमता नष्ट झाली आहे. हे नुकसान एका वर्षाचे नसून, ते पाच वर्षांचे आहे. त्यामुळे किमान पाच वर्षे सरासरी कतारचे २० अब्ज डॉलर्स इतके नुकसान होणार आहे. याची झळ युरोपप्रमाणे आशियाई देशांनाही बसणार आहे. इसरायलचे पंतप्रधान नेतन्याहू आणि त्यांचे जानी दोस्त ट्रम्प यांच्यामुळे जगाचे केवढे अपरिमित नुकसान झाले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे! कारण अगोदर या दोन देशांनी युद्ध सुरू केले आणि नंतर इराणने त्याला प्रत्युत्तर देण्यास आरंभ केला. हे युद्ध चुटकीसरशी संपेल असे ट्रम्प म्हणाले होते. प्रत्यक्षात ते लांबतच चालले आहे. इराण हा देशच बेचिराख करण्याच्या त्यांच्या वल्गना अद्याप पूर्णत्वास जात नसून, उलट अमेरिकेतूनच ट्रम्प यांना आता विरोध सुरू झाला आहे.

अमेरिकेच्या ‘नॅशनल काउंटर टेररिझम सेंटर’चे संचालक जो केंट यांनी राजीनामा दिला आहे. इराणपासून कोणताही तात्काळ धोका नसल्याचे सांगत त्यांनी युद्धाला विरोध केला होता. इराणविरुद्ध युद्धास तीन आठवडे लोटले असून, युद्ध लवकरच संपेल असे पोकळ आश्वासन ट्रम्प देत आहेत. पेंटॅगॉनने युद्धासाठी अमेरिकन प्रशासनाकडे २०० डॉलरची मागणी केली आहे. कारण पैशाशिवाय युद्ध कसे खेळणार? अमेरिकन सरकारला आता इराणी तेलाच्या जागतिक बाजारातील विक्रीवर असलेले निर्बंध उठवण्याचा विचार करणे भाग पडत आहे. आम्ही सतत वीस दिवस क्षेपणास्त्र डागल्यामुळे इराणची युरेनियम समृद्धीकरणाची क्षमता, त्याचप्रमाणे दूर पडल्याची क्षेपणास्त्रे डागण्याची क्षमता खतम झाली आहे, असा दावा नेतन्याहू यांनी केला आहे. हे जर खरे असेल, तर मग ते ताबडतोब युद्ध थांबवत का नाहीत? इराणने युरेनियमचे समृद्धीकरण करून त्याचा प्रचंड साठा इस्फहान येथे दडवून ठेवला आहे, असा आरोप अमेरिकेने गेल्यावर्षी केला होता. त्यासाठी गतवर्षी इराणवर हल्ले करण्यात आले. पण या आरोपाबाबतचा कोणताही पुरावा देण्यात आलेला नव्हता.

अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री जनरल कॉलिन पॉवेल हे एकदा म्हणाले होते की, तुमच्या अंदाजापेक्षा युद्ध केव्हाही अधिक तीव्रतेचे आणि भीषण बनू शकते आणि एकदा का युद्धात पडलो, की त्यातून बाहेर पडणे महामुष्कील असते. खरे तर अमेरिकेतील सामान्य लोकांनीदेखील या युद्धाचे कोणकोणते भीषण परिणाम होणार आहेत, त्याची अध्यक्षांना कल्पना दिली होती. परंतु अध्यक्षांनी त्याच्याकडे लक्ष दिले नाही. इसरायलने साऊथ पार्सवर हल्ला चढवला, याची मला माहिती नव्हती, असे ट्रम्प म्हणत असले, तरीदेखील व्हाइट हाऊसमधील सूत्रांनुसार, ट्रम्प यांना या सगळ्या गोष्टीची माहिती होती. उलट या हल्ल्यासाठी अमेरिकेने इसरायलला मदतही केली होती, असा गौप्यस्फोट ‘द गार्डिन’ या वृत्तपत्राने आपल्या संपादकीयातच केला आहे. अशा प्रकारचा हल्ला केल्यास होर्मुझ सामुद्रधुनी उघडणे इराणला भाग पडेल, हा वॉशिंग्टनचा अंदाज होता. प्रत्यक्षात उलटेच घडले आहे. इराणने इसरायल, कतार, यूएई वगैरे देशांवर तुफान हल्ले चढवले आहेत. आमच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर हल्ला केल्यास, ते अजिबात सहन केला जाणार नाही. उलट सणसणीत धडा शिकवू, असा पवित्रा इराणने घेतला आहे.

 

इराण विरुद्धच्या युद्धातून इसरायलला काय हवे आहे, तेदेखील कळत नाही.

 

इटली, बेल्जियम, दक्षिण कोरिया, चीन या देशांना कतारमधून गॅस जातो. आता आम्ही या देशांशी केलेल्या दीर्घकालीन करारांनुसार गॅसचा पुरवठा करू शकणार नाही, असे कतारने स्पष्ट केले आहे. तिकडे रशियन तेलावरील निबंध अमेरिकेने उठवल्यामुळे युरोपीय नेते जाम खवळले आहेत कतार, ओमान वगैरे आखाती देश हे हवालदिल झाले असून, ट्रम्प यांचे आपल्या परराष्ट्र धोरणावर कोणतेही नियंत्रण नाही, अशी टीका तिथून करण्यात येत आहे. इराण विरुद्धच्या युद्धातून इसरायलला काय हवे आहे, तेदेखील कळत नाही. एवढे मात्र नक्की की, इराणमध्ये इसरायलला स्थैर्यच नको आहे आणि हेच त्यांचे धोरण आहे... परंतु पश्चिम आशियातील इतर देशांना तेथे स्थैर्य आणि सुरक्षा हवी आहे. कारण ऊर्जास्रोत नष्ट झाल्यास, आपली वाट लागेल हे आखाती देशांना माहिती आहे. आम्हाला या युद्धात का ओढता, असे या देशांना वाटत आहे.

या युद्धामुळे नोव्हेंबरमधील अमेरिकेतील मध्यावधी निवडणुका आपला फायदा होईल का तोटा एवढेच ट्रम्प यांना महत्त्वाचे वाटते. या युद्धात हजारो इमारती कोसळल्या, शेकडो लोक मेले, लक्षावधी निर्वासित झाले, याचे ट्रम्प व नेतन्याहू यांना काहीही पडलेले नाही. दोघांनाही वर्ल्ड हिरो व्हायचे आहे आणि अजरामरदेखील! परंतु दीर्घकाळात अमेरिकेप्रमाणे जगालाही या युद्धाची विषारी फळे चाखावी लागणार आहेत. नेतन्याहू आणि ट्रम्प यांच्यासारखे नेते जगाच्या दृष्टीने किती धोकादायक आहेत, हे पुन्हा पुन्हा. स्पष्ट होत आहे परंतु भारतात जसा विश्वगुरूंचा अंधभक्त संप्रदाय आहे, तसाच अमेरिकेत अजूनही ट्रम्प यांचा जयजयकार करणारा मोठा वर्ग आहे. नेतन्याहू तर समान्य लोकांपासून ते न्यायालापर्यंत कोणाचीही पर्वा करत नाहीत. इसरायल, अमेरिका आणि भारत या तिन्ही देशांतील लोकशाहीचे आपण काय करून ठेवले आहे, ते दिसतेच आहे! सध्याच्या या परिस्थितीचे वर्णन वॉशिंग्टनची कुऱ्हाड, असे करावे का?