Opinion

‘गर्वेन्द्राचं’ घर खाली...

मीडिया लाईन सदर

Credit : इंडी जर्नल

 

मुंबई, ठाणे, कल्याण, वसई, नालासोपारा, पालघर अशा ठिकठिकाणी विकासाला दुथडी भरून पूर आला आहे. विकास कुठेही मिसिंग नाही आहे. झाडांच्या विकासानंदाला तर पारावर राहिलेला नाही. फांद्या पडत आहेत आणि त्याखाली दुर्दैवी जीवांचा बळी जात आहे. पुणे मेट्रो स्टेशनवर उभ्या असलेल्या लोकांना तहान लागली आहे असे वाटल्यामुळे की काय, छतावरून पाण्याची गळती सुरू झाली आणि प्रगतीच्या गंगेमुळे लोकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले...

दुसरीकडे, सत्ताधाऱ्यांची गुर्मी दिवसेंदिवस वाढत असून, टीका त्यांना सहनच होत नाही. आपण अत्यंत कारभारकुशल आहोत, असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा असतो. परंतु प्रत्यक्षात तसे बिलकुल नाही. उदाहरणार्थ पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोत कचऱ्याच्या डोंगराचे स्खलन होऊन मोठी दुर्घटना घडली. हा डोंगर शेजारीच असलेल्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या तीनमजली प्रशासकीय इमारतीवर कोसळला. १८ कामगार इमारतीखाली अडकले. मुळात कचरा डेपोलगत इमारत उभी करण्यास परवानगी तरी कशी मिळाली? काही कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले, परंतु त्यानंतर बचावकार्याची प्रक्रिया मंद झाली. इतके कामगार ढिगार्‍याखाली असताना प्रशासन यंत्रणा ढिम्म होती आणि नेते बाइट देऊन निघून जात होते. पिंपरी-चिंचवड महापालिका भाजपच्या हातात आहे. अशावेळी इतका बेदरकार कारभार असणे, याला काय म्हणायचे? मुंबईमध्ये पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्येसाठी कोण जबाबदार आहे? नवी मुंबईमध्येदेखील भाजपचाच कारभार आहे. त्यांचीच सत्ता आहे. तेथील चार हजाराहून अधिक अनधिकृत बांधकामांना जबाबदार असलेल्या जवळपास ४०० अधिकाऱ्यांना नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी नुकतीच कारणे दाखवा नोटीस पाठवली. परंतु ज्यांनी आज राजकीय आशीर्वाद दिला, त्याच्यावरील कारवाईचे काय?

 

पक्ष फोडण्याच्या तंत्राचे प्रचलितीकरण करण्याबद्दल फडणवीस यांचे जेवढे कौतुक करावे, तेवढे थोडेच!

 

मुंबई महापालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती आहे. त्यावर अद्याप तज्ञांची नेमणूकच करण्यात आलेली नाही. मोठमोठ्या प्रकल्पांच्या घोषणा करायच्या आणि लोकांचे डोळे दिपवून टाकायचे, हाच प्रकार सुरू आहे. अशावेळी वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधी या सर्वांशी विचारविनिमय करण्याची गरज आहे. परंतु सर्वकाही मलाच समजते असा गर्व झाले असल्यास, कारभार कसा सुधारणार, हा प्रश्नच आहे. महाराष्ट्रातील अनेक भूतपूर्व मुख्यमंत्र्यांच्या आसपास होयबांचा नव्हे, तर जाणकारांचा गोतावळा असे. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आसपास प्रवीण दरेकर, अभिमन्यू पवार, प्रसाद लाड, नितेश राणे, चित्राताई वाघ, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत अशांचे कोंडाळे असले, तर कठीणच आहे...

या सर्व पार्श्वभूमीवर, 'महाराष्ट्राचा अपमान केल्यास सोडणार नाही' अशी गर्जना महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. याला सोडणार नाही,' 'त्याला सोडणार नाही' अशी त्यांची भाषा महाराष्ट्र बरीच वर्षे ऐकतो आहे. परंतु कोणाला धरायचे आणि कोणाला सोडायचे हे ठरलेले असते!

'आमच्या पुढे कोणी पैलवानच नाही', अशा वल्गना करूनदेखील, २०१९ मध्ये लाडक्या देवाभाऊंना भाजपच्या जागा २०१४ च्या तुलनेत वाढवता आल्या नाहीत. उलट त्या कमीच झाल्या... त्यानंतर ते ८० तासांचे मुख्यमंत्री झाले. परंतु शरद पवार उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांनी 'दंगल' करून त्यांच्यावर डाव उलटवला. पुन्हा एकदा अस्मान दाखवून माघारी पाठवले. त्यानंतर पुन्हा यायचेच असे ठरवून, नागपुरी चाणक्याने राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत मते फोडली. त्यानंतर प्रथम शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडणे हे प्रकार करून, सत्ता मिळवली व अधिक भक्कम केली. पक्ष फोडण्याच्या तंत्राचे प्रचलितीकरण, म्हणजेच नॉर्मलायझेशन करण्याबद्दल फडणवीस यांचे जेवढे कौतुक करावे, तेवढे थोडेच!

 

 

शिवाय ज्यांना शिवसेना, राष्ट्रवादी किंवा काँग्रेसमधून आपल्याकडे वा आपल्याबरोबर आणले आहे, त्यांचे व्यवस्थित पालनपोषण केले जात आहे. त्यामुळे एखाद्या प्राण्याला किंवा पक्ष्याला जंगलातून घरी आणल्यावर हळूहळू तो माणसाळतो, तशी ही आयात केलेली व फोडलेली माणसे - मग त्यांचा पक्ष कुठलाही असो - ती 'भाजपाळलेली' होतात. म्हणजे त्यांचे वागणे बनावटी होऊ लागते... त्यांची भाषा एकदम कमळाबाईची होऊन जाते... भाजपने लिहून दिलेले स्क्रिप्ट वाचून, ते प्रॅक्टिस करून, (चॅनेलालयातून पक्षा-घरी आणलेला एक पोपट अलीकडे कसा पढवल्याप्रमाणे बोलतो, त्याप्रमाणे) चुरूचुरू बोलण्यात ते वाकबगार होतात.

एखाद्या पक्षाचे अस्तित्व संपवायचे असेल, तर प्रथम त्याच्याशी दोस्ती करायची, नंतर त्याला काही काळ भरपूर संधी द्यायची, सत्तेचे लाभ मिळवून द्यायचे आणि नंतर पाहता पाहता त्याला व त्याच्या पक्षाला संपवायचे, ही भाजपची कूटनीती असते. ज्यावेळी एकनाथ शिंदे किंवा छगन भुजबळ अथवा सुनील तटकरे यासारखी मंडळी, जाहीर कार्यक्रमांत पंतप्रधान मोदी किंवा आपले कौतुक करतात, त्यावेळी सभास्थानी हजर असलेल्या मोदी वा फडणवीस यांचा चेहरा पाहण्यासारखा असतो... आपला गुलाम हा गुलामी किती समरसतापूर्वक करत आहे, याचे कौतुक त्यांच्या डोळ्यांत पाहायला मिळते... हे रम्य दृश्य पाहण्यासाठी असे कार्यक्रम तुम्ही जरूर पाहात जा!

जितनी चाबी भरी राम ने, अरे उतना चले खिलौना' हे फडणवीसांना नीट ठाऊक आहे. काही काळाने 'खिलौना जानकर तुम तो, मेरा दिल तोड जाते हो' असे म्हणण्याची पाळी महायुतीतील काही आयातीत नेत्यांची होणार आहे... कारण चाबी देवाभाऊकडे आणि मास्टरकी मोदी-शहांकडे आहे.

 

मिसिंग लिंकच्या बोगद्याबाहेर दरड कोसळून झालेली दुर्घटना, जुलै २०२६

 

अशा या आपल्या या लाडक्या आणि हुश्शार मुख्यमंत्र्यांना आपल्यावरील टीका सहन होत नाही. माझ्यापुढे कोणी विरोधकच राहिलेला नाही, त्यांना काही समजतच नाही, विरोधी पक्ष म्हणून कसे काम करायचे, हे मी त्यांना शिकवतो अशी फडणवीस यांची सातत्याची भाषा असते. 'हे कोण? ते कोण?' 'मी माझ्या लेव्हलच्या माणसांनाच उत्तर देतो, इतरांना माझे प्रवक्ते आणि बारीकसारीक नेते प्रत्युत्तर देतील' असा फडणवीसांचा सूर असतो.

खरे तर फडणवीस हे काही इंजिनीयर नाहीत. तरीही मिसिंग लिंक प्रकल्पाबाबत फक्त तेच अधिकारवाणीने बोलू शकतात, असे काही नाही. माजी मुख्यमंत्री (जे स्वतः इंजिनीयर आहेत) पृथ्वीराज चव्हाण यांनी मिसिंग लिंक प्रकल्पाबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते आणि म्हणून त्या प्रकल्पास हिरवा कंदील दिला नव्हता. माजी आमदार आणि नगर नियोजन व वास्तुरचना यातील तज्ञअनंत गाडगीळ यांनी देखील या प्रकल्पाबाबत काही रास्त प्रश्न उपस्थित केले आहेत. फडणवीस स्वतः वकील असून, कदाचित प्रत्येक गोष्टीतील सर्व ज्ञान आपल्यालाच आहे, असा त्यांचा समज झाला असावा. टीकाकार हे काही महाराष्ट्रद्रोही नाहीत. ते महाराष्ट्रप्रेमातूनच टीका करत असतात, हे लक्षात घेतले पाहिजे. विरोधक आणि टीकाकार यांनी सभ्य शब्दात व्यक्त व्हावे, ही अपेक्षा योग्यच आहे. परंतु सभ्य आणि सुसंस्कृत टीका म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही!

गेल्या चार वर्षांतील महाराष्ट्राच्या अपमानाची उदाहरणे खुद्द एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या राज्यातही सापडतील... परंतु तो स्वतंत्र विषय आहे! महाराष्ट्रातील एका विशिष्ट वर्गास फडणवीस यांचे राज्य म्हणजे 'या गोजिरवाण्या घरात' किंवा 'काळात' असा फील देणारे राज्य वाटते. महाशक्तीच्या एका लाडक्या ताईंनी तर 'पुढच्या पिढ्या महाराष्ट्राच्या विकासाच्या देवगाथा गातील', असे देवस्तवन म्हणूनही टाकले आहे! परंतु वास्तवात हा 'देव'काल कसा आहे? कमालीचा भ्रष्टाचार, स्त्रियांवरील अत्याचार आणि राज्यकर्त्यांची दादागिरी अशा घटनांमुळे महाराष्ट्राचा बिहार होऊ घातला आहे. लालूप्रसाद सत्तेवर असताना बिहारला जंगल राज म्हणणाऱ्या भाजपाला, उद्या महाराष्ट्राबद्दल असेच उद्गार कोणी काढल्यास ते चालेल का? का तो महाराष्ट्राचा अपमान समजून, त्याच्यावर कारवाई केली जाईल?

 

संस्कारी पक्षात नसलेले अनेक नेते हे खऱ्या अर्थाने सुसंस्कृत होते व आहेत.

 

मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाण उर्फ बाबा यांच्यावर भाजपवाले टीका करतच होते. खुद्द शरद पवार यांनी 'त्यांच्या हाताला लकवा मारला आहे का?' असे उद्गार काढले होते... परंतु बाबांनी ही टीका सहन केली आणि जहरी भाषेत उत्तर देण्याचे टाळले. कारण बाबा हे आतूनबाहेरून सुसंस्कृत गृहस्थ आहेत. राष्ट्रवादीच्या भ्रष्ट नेत्यांच्या टीकेला उत्तर देण्याच्या फंदात न पडता, ते आपले काम नेकीने करत राहिले. खरे तर संस्कारी पक्षात नसलेले अनेक नेते हे खऱ्या अर्थाने सुसंस्कृत होते व आहेत.

याबाबत महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे.

१२ जुलै १९६१ रोजी पुण्यातील पानशेत धरण फुटले. काही तासांतच पुराचे पाणी पुण्याच्या शनिवार पेठ, नारायण पेठ, कसबा पेठ यासारख्या सखल भागांत पसरले. त्यावेळी मी लहान होतो. धरणाच्या बांधकामातील चुका, इशारे दुर्लक्षित करणे यावरून यशवंतराव चव्हाण यांच्या सरकारवर तेव्हा टीका झाली. परंतु टीकाकारांना यशवंतरावांनी महाराष्ट्रद्रोही ठरवले नाही! खुद्द यशवंतरावांनी स्वतः पुण्यात तळ ठोकून, लष्कराच्या साह्याने मदतकार्य राबवले. त्यावेळी कॅमेरामन हायर करून, शूट करत कार्य करण्याची पद्धत नव्हती. संकट ही नेहमी संधी असते, असे म्हणत त्यावेळी यशवंतरावांनी पूरग्रस्त पुण्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी शहराचा नवा विकास आराखडा तयार केला. पानशेतच्या पुराने पुण्याचा चेहराच बदलून टाकला. पूरग्रस्तांसाठी घरे बांधण्यात आली आणि माझ्या शाळेतील अनेक मुले या पूरग्रस्तांच्या घरात राहत होती. पानशेतचे धरण फुटले, त्या दिवशी नाइलाजाने खडकवासला धरणाची भिंतही फोडावी लागली आणि त्यानंतर पुण्यात हाहाकार झालेला अनेकांनी पाहिला...

पुणे शहरात १९५८ मध्ये देखील मोठा पूर आला होता. तेव्हा आत्ताच्या काँग्रेस भवनच्या पायरीला पाणी लागले होते. पानशेतची घटना त्याहून भयानक होती. आताच्या वृद्धेश्वर मंदिरासमोर असलेली एक इमारत मुळापासून वाहून गेलेली त्यावेळी अनेकांनी डोळ्यांनी पाहिली होती. पानशेत दुर्घटनेनंतर तत्कालीन काँग्रेस सरकारवर टीका झाली, आरोप झाले. पण आरोप करणार्‍यांना दमदाटी करण्याची तेव्हा पद्धत नव्हती! सदाशिव गोविंद उर्फ स. गो. बर्वे हे पुण्याचे जिल्हाधिकारी होते. त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिका अस्तित्वात आल्यावर सुरुवातीची तीन वर्षे ते पालिका आयुक्त देखील होते. त्या काळात बर्वे यांनी पुण्याभोवती रिंग रेल्वेची कल्पना मांडली होती. दुर्दैवाने मुंबईत आणि दिल्लीत बसलेल्या राज्यकर्त्यांनी ती अमलात आणण्याबाबत उत्साह दाखवला नाही.

 

पानशेत, १९६१

 

प्रशासकीय काम करत असताना बर्वे यांना राज्य सरकारच्या शासन सुधारणा समितीवर काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी त्यांनी सत्ताधारी काँग्रेसवर साधार टीका केली होती. परंतु यशवंतराव चव्हाण यांनी ती टीका सकारात्मक रीतीने घेत, त्यांना प्रोत्साहन दिले आणि उलट आपल्या सहकार्‍यांनाच सुनावले. बर्वे यांच्या टीकेपासून बोध घेऊन कामात सुधारणा करा, असे सांगितले. बर्वे यांना तुरुंगात टाकण्याची धमकी दिली नाही... पुढे व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी स्वतः राजकारणात जावे, असे बर्वे यांना वाटू लागले आणि त्यानंतर तत्कालीन काँग्रेसकडून त्यांनी निवडणूक देखील लढवली. त्यापूर्वी सनदी नोकरीचा राजीनामा दिला. मात्र ते सेवामुक्त होण्याआधीच, १२ जुलैला पानशेतची घटना घडली. त्यावेळेस मुख्यमंत्री यशवंतराव यांनी मदत व पुनर्वसन कार्यासाठी बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली त्याच दिवशी समिती नेमली.

पुराच्या दुसऱ्या दिवशीपासून अडीच महिने ते कार्यालयातच राहायला गेले. त्यांच्यासोबत सात, आठ कर्मचारी होते. पहिल्या चार दिवसांत वीज आणि पाणीपुरवठा सुरळीत झाला. खडकवासल्याचा मुख्य स्रोत बंद झाला आणि बंधाऱ्याच्या दुरुस्तीला वेळ लागणार हे दिसत होते. मुळशी धरणातून पुण्यात पाणी आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयोग तीन महिन्यांत पूर्ण झाला. दोन आठवड्यांत तीन लाख लोकांना प्रतिबंधक लस टोचून झाली. १०० केंद्रात ३६,००० नागरिकांना निवारा मिळाला. पूरस्थिती नियंत्रणात आणताना सर्व सरकारी विभागांचा ताळमेळ राखत बर्वे यांनी प्रशंसनीय काम केले.

 

आसपास होयबा आणि हांजी हांजी करणारे लोक असले की, टीकेचे सूर ऐकायची सवय नाहीशी होते.

 

यशवंतराव त्यांच्या मागे ठामपणे उभे होते. त्यावेळी विरोधकांनी केलेल्या सूचना आणि टीकेची बर्वे आणि यशवंतराव या दोघांनीही दखल घेतली. टीकाकारांनी पाकिस्तानात चालते व्हावे, टीकाकार हे शहरी दहशतवादी आहेत, असे कोणीही म्हटले नाही! आजचा काळ हा ज्यांना गोजिरवाणा वाटत आहे, त्यांच्यासाठी या गोष्टी सांगणे आवश्यक वाटते.

राजकारणाच्या प्रवासात अनेकांनी यशवंतरावांच्या विरोधातल्या भूमिका घेतल्या होत्या, पण त्या कोणासंबंधातही यशवंतरावांनी कधीच टोकाची भूमिका स्वीकारली नाही. संबंधित विरोधकांच्या निधनानंतर, त्यांच्या घरातील नंतरच्या पिढीतील तरुणांचे पालक म्हणून यशवंतरावांनी आपली भूमिका पार पाडली. त्यामध्ये बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ, व्यंकटराव हिरे, रवींद्र मोरे, गुलाबराव जेधे यांचा प्रकर्षाने उल्लेख करता येईल. यातून यशवंतरावजींचे मोठेपण व समाजभान अधोरेखित होते. कारण त्यांची राजकीय आणि सामाजिक विचारांची उंची मोठी होती. सत्तेमुळे अल्पावधीत गुर्मी येते आणि आसपास होयबा आणि हांजी हांजी करणारे लोक असले की, टीकेचे सूर ऐकायची सवय नाहीशी होते. अशावेळी असहिष्णुता बळावते. महायुती आणि भाजपमध्ये फडणवीस यांच्या धोरणांबाबत मतभिन्नता व्यक्त करणारे कोणी आहे, असे दिसत नाही. 'हो' ला 'हो' करणारेच लोक त्यांच्या आसपास असतात. त्यामुळे सध्या तरी या गोजिरवाण्या घरात 'होय'चे बहुमत दिसते! वरून साजिरे दिसणारे असे हे घर, आतून मात्र विरूप आहे.. महाराष्ट्रावर ज्यांचे खरे प्रेम आहे, त्यांनी हे सर्व व्यवस्थित लक्षात ठेवले पाहिजे!