Quick Reads

परमार्थाच्या मार्गावरील पक्षांतरवादी खासदार!

मीडिया लाईन सदर

Credit : इंडी जर्नल

 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. हे सहा खासदार स्वार्थापोटी आलेले नाहीत, तर मतदारसंघाला न्याय देण्यासाठी आले आहेत. त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही, असे उद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले आहेत. हे सहाही खासदार परमार्थासाठी शिंदेसेनेत आले आहेत, असे गृहीत धरणे आपल्याला भाग आहे... त्यातील एक खासदार संजय दीना पाटील यांनी परमार्थ करता करता, पत्रकारांना आईमाईवरून शिव्या घातल्या आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांना धमक्या दिल्या. बॉम्ब टाकू, स्मशानात पाठवू असेही ते म्हणाले. नंतर त्यांनी माफीनामाही दिला.

सहापैकी एक खासदार ओमराजे निंबाळकर यांना आतापर्यंत विकासनिधी मिळत नव्हता, अशी त्यांची तक्रार होती. प्रत्यक्षात या सहाही खासदारांना निधी मिळाला होता, पण त्यांनी त्यापैकी अत्यल्प हिस्साच खर्च केला. ओमराजेंनी पक्षांतर करताच त्यांना शिंदे यांनी नगरविकास व अन्य खात्यांतील करोडो रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. याचा अर्थ, जोपर्यंत तुम्ही उद्धव यांच्या पक्षात असाल, तोपर्यंत तुम्हाला एक छदामही माझ्याकडून दिला जात नव्हता, याची कबुलीच शिंदे यांनी दिली आहे. अर्थात एकनाथ शिंदे यांच्या कक्षेपलीकडील काही निधी खासदारांना मिळालेला होता. पक्षांतर करणारे बहुतेक खासदार हे कृतघ्न तर आहेतच, परंतु भ्रष्ट आणि कावेबाजही आहेत असा लोकांचा समज आहे. आता आगामी काळात उद्धवसेनेचे आणखी आमदार फुटतील, असे भाजपचे खासदार नारायण राणे यांनी म्हटले आहे. एवढेच नव्हे, तर खुद्द एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत त्याबाबतचे सूतोवाचही केले आहे. इतके दिवस ‘ऑपरेशन टायगरशी आमचा काहीही संबंध नाही, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे अन्य नेते म्हणत होते. ही मोहीम फत्ते झाल्यानंतर, आता या मोहिमेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच शिष्टाई केली, असे सांगितले जात आहे. फडणवीसांचा वरदहस्त असलेले आमदार प्रवीण दरेकर यांनी तर तशा आशयाचे वक्तव्य जाहीरपणेच केले आहे. फोडाफोडी करणे म्हणजे काहीतरी पराक्रम केल्यासारखे या मंडळींना वाटत आहे. एकूण निर्लज्जपणाचा कहर सुरू आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासात अनेकांनी पक्षांतरे केली, परंतु ती रिटेल लेव्हलला होती. गद्दारीयुक्त होलसेल पक्षांतरे करून, शिवाय महाराष्ट्राचा विकासपुरुष नंबर दोन आणि इन्फ्रा मॅन नंबर वन (देवाभाऊ ब्रिगेड म्हणते, आमचाच नेता खरा इन्फ्रा मॅन) हा बहुमान मिळवणारा म्हणून एकनाथ शिंदे यांचे नाव इतिहासात अजरामर होणार आहे... ठाणे, दरे एवढेच नव्हे, तर महाराष्ट्राच्या, भारताच्या आणि जगातील अनेक देशांच्या पुढील पिढ्या आदर्श पक्षांतरपुरुष म्हणून एकनाथभाईंकडे पाहत आहे...

 

एकनाथभाईंपूर्वी पक्षांतराचा अजीबो गरीब प्रयोग हरियाणाचे मुख्यमंत्री भजनलाल यांनी करून दाखवला होता!

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे ते लाडके भाऊ-भाई आहेत. जाहीर कार्यक्रमांत व्यासपीठावर अनेकजण असतात. परंतु मोदीसाहेब फक्त एकनाथभाईंशीच खरा सुसंवाद साधतात. यामुळे करोडो मराठीजनांची मान जिराफाइतकी उंच झाली आहे. अर्थात एकनाथभाईंपूर्वी पक्षांतराचा अजीबो गरीब प्रयोग, म्हणजेच काय हो चमत्कार, हा हरियाणाचे मुख्यमंत्री भजनलाल यांनी करून दाखवला होता! भजनलाल हे मुळात फाळणीपूर्वी अविभक्त पंजाबच्या बहावलपूरचे निवासी. फाळणीनंतर भजनलाल यांचे कुटुंब हिस्सार येथे आले. भजनलाल स्वतः कापडाचे व्यापारी होते आणि नंतर ते राजकारणात आले. हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणून भजनलाल यांनी अकरा वर्षे नऊ महिने काम केले.

भजनलाल हे आधी कापड व्यवसायात होते. मग ते धान्याचाही व्यापार करू लागले. त्यानंतर सोन्याचा आणि तुपाचा व्यापार करण्याचे काम त्यांनी १९६५ पासून सुरू केले. समृद्धपुरुष एकनाथभाई व त्यांच्या सहकाऱ्यांना जसे वाटते की, आपली सगळी बोटे तुपात असावीत, तसा विचार १९६० च्या दशकातच भजनलाल यांच्या मनात आला असावा. ते राजकारणात शिरले ते ब्लॉक समितीचे अध्यक्ष बनले.

व्यापारी असल्यामुळे राजकारणात देखील यशस्वी कसे व्हायचे, हे त्यांना नीटपणे ठाऊक होते. आणि पाहता पाहता काँग्रेसमध्ये त्यांचे नाव होऊ लागले. कोणाचे भजन कधी करायचे, ते हरियाणाच्या या लालला व्यवस्थितपणे ठाऊक होते. १९६७ मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाचे आमदारकीचे तिकीट मागितले. आदमपूर मतदारसंघातील एका काँग्रेसच्या आमदाराने पक्षांतर केले होते. म्हणून ती जागा भजनलाल यांना मिळाली. तेथून तिकीट मिळाल्यावर त्यांनी पहिल्याच पदार्पणात यश मिळवले. त्यावेळीचे तत्कालीन मुख्यमंत्री चौधरी बन्सीलाल यांचे ते निष्ठावंत होते. भजनलाल हे बन्सीलाल यांची बासरी वाजवू लागले. लगोलग भजनलालजींची नेमणूक हरियाणा मार्केटिंग बोर्डच्या अध्यक्षपदी झाली. तिथे भजनलाल यांची समृद्धी आणखी वाढली. त्यानंतर १९७० साली ते कृषिमंत्री झाले.

 

१९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनता पक्षाचा जन्म झाला.

 

१९६८ ते १९७५ या काळात बन्सीलाल हे हरियाणाचे मुख्यमंत्री होते. नंतर २१ डिसेंबर १९७५ ते २४ मार्च १९७७ या काळात बन्सीलाल हे देशाचे संरक्षणमंत्री होते. बन्सीलाल हरियाणाचे मुख्यमंत्री असताना १९७२ मध्ये आमदारांची पळवापळवी होण्याची शक्यता होती. त्यावेळी आमदार निवासात खांद्यावर बंदूक ठेवूनच पहारा देत भजनलाल उभे राहिले. मात्र भजनलाल स्वतःच पुढे काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले नाहीत!

१९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनता पक्षाचा जन्म झाला. त्याबरोबर भजनलाल यांनी जगजीवनराम यांच्या 'लोकशाहीवादी काँग्रेस'मध्ये प्रवेश केला. हा पक्ष नंतर जनता पक्षात विलीन झाला. हरियाणात १९७९ मध्ये देवीलाल यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार होते. ते हिस्सार आणि सिरसाच्या दौऱ्यावर असताना त्यांना कळाले की, तत्कालीन दुग्धविकासमंत्री भजनलाल यांच्यासह एकूण चार मंत्र्यांनी 'बंड', म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या भाषेत 'उठाव' केला. हे कळताच देवीलाल सावध झाले. त्यांनी आपले ४२ समर्थक आमदार गोळा केले आणि त्यांना सिरसा येथील फार्म हाऊसवर ठेवले. बाहेर पोलीस पहारा ठेवलेला होता. भजनलाल यांना आपले बंड यशस्वी होण्यासाठी आणखी दोन आमदारांची आवश्यकता होती. देवीलाल यांच्या ताब्यात असलेल्या आमदारांमधून एकजण लग्नाला जायचे म्हणून आणि दुसरा आपले काका आजारी आहेत म्हणून तेथून सटकला. थोड्यावेळाने काहीतरी गडबड आहे हे लक्षात येताच, देवीलाल त्या लग्नसोहळ्याच्या ठिकाणी गेले, तेव्हा तेथे भजनलाल हजर असल्याचे त्यांना आढळून आले...

भजनलाल यांनी देवीलाल यांच्या ताब्यातील आमदारांकडे, त्यांच्या कुटुंबीयांना पाठवले आणि त्यांच्यामार्फत संदेशांची देवाणघेवाण केली! त्यामधून दोन आमदार त्यांच्या गळाला लागले होते. २६ जून १९७९ रोजी देवीलाल यांना विश्वासदर्शक ठराव संमत करून घ्यायचा होता. परंतु त्यांना आपल्यामागे बहुमत नाही हे लक्षात येताच, राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या जागी भजनलाल हे मुख्यमंत्री बनले! त्यावेळी त्यांच्याकडे देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा राजकीय पटकथालेखक नव्हता. अन्यथा मी हा जो उठाव केला आहे, तो विकसित हरियाणासाठीच, असे ते म्हणाले असते!

 

भजनलाल हे देखील एकनाथभाईंप्रमाणे उदार मनाचे.

 

हरियाणातील राजकारणात प्रथमपासूनच भ्रष्टाचार आणि दादागिरी होती. परंतु १९८० मध्ये भजनलाल यांनी आपल्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला! जनता पक्षाची राजवट जाऊन लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधींना यश मिळाले होते. त्या पुन्हा एकदा पंतप्रधान बनल्या होत्या. आता त्या आपले जनता पक्षाचे सरकार बरखास्त करणार, अशी भीती भजनलाल यांना वाटू लागली. त्यामुळे २२ जानेवारी १९८० रोजी त्यांनी आपले जनता पक्षाचे संपूर्ण मंत्रिमंडळच काँग्रेस सरकारमध्ये रुपांतरित केले. म्हणजे समर्थक आमदारांसह त्यांचे अवघे सरकारच काँग्रेसमध्ये सामील झाले. पुन्हा एकदा भजनलालच मुख्यमंत्री बनले. जनता पक्ष गेला तेल लावत, असाच भजनलाल यांचा हा पवित्रा होता! आपण जे काही केले, ते विकासासाठी आणि विकसित भारतासाठी असे म्हणण्याची तेव्हा पद्धत नव्हती एवढेच!

भजनलाल हे देखील एकनाथभाईंप्रमाणे उदार मनाचे. एकनाथभाई ज्याप्रमाणे कार्यकर्ते, आमदार, खासदारांच्या फंडांच्या इच्छा पूर्ण करतात किंवा त्यांची कामे करतात, तसाचच भजनलाल यांचा स्वभाव होता. हलवायच्या घरावर तुळशीपत्र ठेवायला जातते काय! हपापाचा माल गपापा! हरियाणा नगर विकास प्राधिकरणाचे मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातील भूखंड, भजनलाल धडाधड वाटत सुटले होते. राजकारणी, प्रशासक, पोलीस अधिकारी, न्यायाधीश, पत्रकार या सर्वांना... एवढेच काय, प्युनलादेखील हे भूखंड देण्यात आले.

१९९६ मध्ये पंचकुला येथील एक भूखंड भजनलाल यांनी धकधक गर्ल माधुरी दीक्षितलाही दिला होता. माधुरीने तो भूखंड २०१९ मध्ये विकून टाकला. एकदा भजनलाल लिफ्टने आपल्या मुख्यमंत्र्याच्या कार्यालयात जात असताना, लिफ्टमनला त्यांनी विचारले की, तू कुठे राहतोस? तुझ्या मालकीचे घर आहे का? लिफ्टमन म्हणाला की, माझ्या मालकीचे घर नाही. तेव्हा त्याला ताबडतोब घरासाठी मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातील भूखंड द्या, अशी ऑर्डर सोबतच्या अधिकाऱ्यांना भजनलाल यांनी तिथल्या तिथे दिली. केवढी ही कार्यक्षमता! आता हरियाणातील सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री असल्यावर हे सगळे करणे आलेच की.. तथ्यांची खातरजमा न करता भजनलालनी स्वतःच्या मालकीचा भूखंड अशाप्रकारे चुटकीसरशी दिला असता का? असा भाबडा प्रश्न आपल्या मनात येणे स्वाभाविक आहे...

 

'महाराष्ट्रातील भजनलाल'चे भविष्यकाळात काय होईल, ते २०२९ पर्यंत नक्की स्पष्ट होईल!

 

१९८२ मध्ये देवीलाल हरियाणाचे मुख्यमंत्री होते. परंतु तुम्ही बहुमत सिद्ध करून दाखवा, असा आदेश राज्यपाल गणपतराव तपासे यांनी त्यांना दिला. तेव्हा संतापलेल्या देवीलाल यांनी गणपतरावांच्या कानफटात लगावली होती, अशा बातम्या होत्या. त्यावेळी भजनलाल यांनी विरोधी पक्षातील २० आमदार फोडून आपले बहुमत सिद्ध करून दाखवले होते. १९९१ साली भजनलाल पुन्हा मुख्यमंत्री बनले, त्यावेळी देवीलाल यांच्या कुटुंबात हाणामार्‍या सुरू होत्या आणि त्यामुळे ओमप्रकाश चौटाला यांचे सरकार कोसळले. मात्र २००५ मध्ये भजनलाल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला विधानसभेत चांगले यश मिळाल्यानंतर देखील मुख्यमंत्रीपदी भूपेंद्रसिंग हुडा यांची निवड झाली. त्यामुळे खवळलेल्या भजनलाल यांनी दोन वर्षांतच काँग्रेस पक्ष सोडला आणि 'हरियाणा जनहित काँग्रेस' ('एचजेसी')ची स्थापना केली. त्यांच्यासमवेत कुलदीप विष्णोई हा त्यांचा मुलगाही होता. त्यांचा थोरला मुलगा चंदरमोहन हा हुडा यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होता.

२००८ मध्ये चंदरने इस्लाम धर्मात प्रवेश करून अनुराधा बाली या मुलीशी लग्न केले. तिने नंतर 'फिजा' हे नाव धारण केले. त्यामुळे भडकलेल्या भजनलाल यांनी आपल्या मालमत्तेतील एक छदामही चंदरला मिळणार नाही, अशी व्यवस्था केली! २०१२ मध्ये फिजाचे संशयास्पद परिस्थितीत निधन झाले. २००९ मध्ये भजनलाल हिस्सार लोकसभा मतदारसंघातून एचजेसीच्या तिकिटावर निवडून आले. त्याच वर्षी विधानसभा निवडणुकांत एचजेसी किंगमेकरच्या भूमिकेत होती. परंतु हुडा यांनी सहापैकी एचजेसीचे पाच आमदार फोडून आपल्याकडे घेतले आणि सरकार स्थापन केले. म्हणजे हुडा यांनी भजनलाल यांच्यावर त्यांच्याच अस्त्राने प्रहार केला. एचजेसीमध्ये फक्त कुलदीप बिश्नोई हा राहिला होता. म्हणजे जे पक्ष फोडण्याचे बीज भजनलाल यांनी हरियाणात रोवले, त्याचीच विषारी फळे त्यांनाच भोगावी लागली. असो. 'महाराष्ट्रातील भजनलाल'चे भविष्यकाळात काय होईल, ते २०२९ पर्यंत नक्की स्पष्ट होईल! एकनाथ शिंदे यांना काहीही करून पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हायचे आहे. मात्र ते सर्व केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे दुश्मन अमित शहा यांच्यावर अवलंबून आहे.