India

पुणे: एमपीएससी परीक्षार्थी हजारोंच्या संख्येनं रस्त्यावर!

पेपरफुटीनंतर विद्यार्थी आक्रमक, पारदर्शकतेचा मागणी.

Credit : इंडी जर्नल

 

महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाच्या (एमपीएससीच्या) परीक्षा देणाऱ्या हजारो तरुण तरुणींनी आज पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरावरून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा आणि पारदर्शक परीक्षा कामकाजाची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे तसेच काँग्रेस नेते विश्वजित कदमदेखील या मोर्च्यात सहभागी झाले. २२ मार्च रोजी अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक पदाच्या भरतीसाठी आयोगानं घेतलेल्या परीक्षेत पेपरफुटी झाल्याचं समोर आल्यापासून राज्यभारतील विद्यार्थी त्याविरोधात आवाज उठवत आहेत.

५ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन रोहित पवार यांनी आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनराव यांच्या राजीनाम्याची मागणी करत लवकरच एमपीएससी विद्यार्थ्यांसोबत आंदोलन करणार असल्याचं सांगितलं होतं. सोमवारी झालेल्या मोर्च्यात विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा शिक्षकांनी फक्त अन्न व औषध प्रशासन नाही तर त्यासोबत इतर परीक्षांमध्ये देखील काही घोटाळा असल्याची शंका व्यक्त केली. 'एमपीएससी अध्यक्ष गो बॅक', 'भिमनराव राजीनामा द्या, मुंढे साहेब पदावर या', यासारखे घोषणा फलक मिरवण्यात आले.

 

 

"मी औषध निरीक्षक परीक्षेची गेली ३ वर्षं तयारी करतोय. यावर्षी माझा कटऑफ ४ मार्कांनी चुकला. माझा विश्वास होता कि एमपीएससीचा पेपर कधीच फुटणार नाही पण आता माझा काहीएक विश्वास राहिलेला नाहीये. मी १२-१३ तास अभ्यास करायचो माझ्या घरच्यांच्या आणि माझ्या अपेक्षेवर पाणी फेरल्यासारखं झालं," नांदेडचा रहिवासी असणारा पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणारा आदित्य घेरे सांगतो.

"हा मोर्चा विद्यार्थ्यांचा आहे. एमपीएससीचा अध्यक्ष, ज्याच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्याचं निलंबन करून त्यांच्या जागी तुकाराम मुंढे किंवा झगडे साहेबांसारखा स्वच्छ प्रतिमेचा अधिकारी नेमण्यात यावा, अशी आमची मागणी आहे. पीएसआय, कृषी, संयुक्त पूर्व परीक्षा यासारख्या अनेक परीक्षांबाबत विद्यार्थ्यांना शंका आहेत. त्या सोडवल्या गेल्या पाहिजेत," रोहित पवार यावेळी बोलताना म्हणाले.

"हा पेपर जर फुटलाय तर बाकी पेपर पण फुटू शकतात. आम्ही गेली इतकी वर्षं अभ्यास करतोय, एमपीएससीच्या परीक्षा पारदर्शकरित्या झाल्याचं पाहिजे.  जर पेपर विकत घेऊन त्यांना एवढे मार्क पडणार असतील, तर आम्ही गेली इतकी वर्ष अभ्यास करून उपयोग काय? माझं वय २६ वर्षं आहे. गेली ४ वर्षं मी तयारी करतेय, मी मुलगी असल्यानं माझ्या घरून मला लग्नासाठी दबावसुद्धा आहे .  दर महिन्याला १०,००० रुपये तरी खर्च येतो. त्यांना ते पैसे पाठवावे लागतात. ते तरी किती दिवस पाठवणार?" साताऱ्यातुन पुण्यात येऊन एमपीएसीची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीनं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं.

 

 

पेपरफुटी प्रकरणानंतर आयोगानं अचानक नियम बदलल्यामुळंदेखील मुलांमध्ये नाराजी आहे. "आधी ५०० मार्कांसाठी वैकल्पिक विषयाचा पेपर होता. तो आयोगानं आता रद्द केला आहे. मग त्या विद्यार्थ्यांचं काय ज्यांनी ९ महिने वैकल्पिकसाठी अभ्यास केला, ३०-३० हजार रुपयांचे क्लास लावले. २०२५ मध्ये तुम्ही वैकल्पिक विषय आणता आणि लगेच दुसऱ्या वर्षी येऊन रद्द केल्याचं सांगता. जर तुम्ही ठाम नसाल, तर ते विद्यार्थ्यांपर्यंत येऊच देऊ नका. आणि कुठल्या नमुन्यावर आधारित तुम्ही गुण देताय ते पण जाहीर करा," सोलापूरची रहिवाशी राणी नागटिळक म्हणाली.

महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाचा औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटल्यानं हे प्रकरण समोर आलं. पण फक्त औषध निरीक्षक नाही तर एमपीएससीच्या इतर परीक्षांमध्ये देखील घोटाळे असल्याचा दावा विद्यार्थी आणि नेते करतात.

 

 

"संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि गट क चा अभ्यास मी करत आहे. आमच्याकडे पुरावे आहेत. अधिकाऱ्यांनी पेपर फोडले आहेत. मी गेली ३ वर्षं अभ्यास करतोय. आम्ही शेतकरी आहोत. यावर्षी तसाही पाऊस झालेला नाहीये, उत्पन्नदेखील कमी आलाय. जर पेपर असेच फुटत राहिले, तर आम्ही अभ्यास कसा करणार? " तुळजापूरचा शिवराज विचारतो.

"नेहमी एक नाहीतर अर्ध्या मार्काने आमची निवड हुकते. आमचा प्रत्येक पेपर फुटला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण,  पुणे महानगरपालिका यांच्या परीक्षांमध्येमध्येही घोटाळे झाले आहेत. मागच्या पेपरमध्ये ७ -८ मार्क पडणाऱ्यांना प्राधिकरणाच्या परीक्षेत अचानक २०० पैकी २०० मार्क कसे पडतात? आमच्या घरचे पण आता घरी परत बोलवतायत. त्यांचाही एमपीएससीवर जराही विश्वास उरलेला नाही," नांदेडमधून आलेल्या स्थापत्य अभियंता अंकित धात्रक सांगतो.

 

 

मोर्च्यात उपस्थित सुप्रिया सुळे म्हणाल्या, "आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश आहे. ५० ते ६० लाख रुपये देऊन जर बाकीचे अधिकारी होत असतील, तर ते महाराष्ट्राला मान्य नाही. तंत्रज्ञानाचा वापर यात का होत नाही? जगभरात अनेक परीक्षा आहेत ज्यांच्या प्रश्नपत्रिका फुटत नाहीत.  माझा याच्यावर विश्वास नाही की पेपर फुटणं थांबवलं जाऊ शकत नाही."

"आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी आंदोलन का करावं लागत आहे? आंदोलनाची वेळच का येते? मी शिक्षिकेची नोकरी करून मग अभ्यास करते. मग एवढ्या कष्टाचा उपयोग काय? एका पेपर मध्ये २-४ गुण आणि दुसऱ्या पेपरमध्ये अचानक भरपूर गुण ज्यांना मिळतात, त्यांनासुद्धा पात्र केलं गेलंय. हा कुठला न्याय आहे?" साताऱ्याची रहिवासी सुप्रिया शिंदे विचारते.

अनेक परीक्षार्थी अशाच प्रकारे दुसरी नोकरी सांभाळून परीक्षेची तयारी करत असतात. "माझ्या घरच्यांची परिस्थिती नसल्यानं मी इथे हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करून खर्च भागवतोय. मात्र दरवर्षी निकालाचा कटऑफ वाढतच चालला आहे. लॉकडाऊनच्या आधी कटऑफ कधीच ५० च्या वर गेला नव्हता. आम्हाला वाटायचं विदयार्थी वाढतायत म्हणून असं होतंय. मात्र गैरप्रकार करून गुण मिळवणाऱ्यांनुसार इथं कटऑफ वाढवले जात आहेत. हे जर असंच होत राहिलं, तर कस चालेल?" जालन्यावरून आलेला अथर्व विचारतो.

 

 

"२०२२ पासून अभिजित लेंढावे पदावर असल्यापासून आयोगांच्या परीक्षांमध्ये अनेक गैरप्रकार होत असल्याचे पुरावे विद्यार्थ्यांकडे आहेत. राज्यसेवेच्या एका विद्यार्थ्याला एका विषयात १५० गुण आहेत आणि त्याच विषयाच्या दुसऱ्या पेपरला १ च गुण दिलेला आहे. इतकी तफावत असू तरी कशी शकते? २०२५ मध्ये संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि गट क परीक्षेत एकाच हॉलमधल्या १२ विद्यार्थ्यांची निवड झाल्याची माहिती आहे. हे कसं शक्य आहे? त्यांची माहिती घेतली पाहिजे पास झालेल्यांची चौकशी झाली पाहिजे. हा लढा फक्त औषध निरीक्षक परीक्षेसाठी नाही तर एमपीएससीच्या इतर परीक्षांसाठीदेखील आहे," सोलापुरवरून मोर्च्यासाठी पुण्यात आलेला अक्षय वायकुळे म्हणाला.

विद्यार्थ्यांनी मोर्च्यात आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यासोबतच परीक्षांमध्ये आणखी पारदर्शकता आणि अधिकारी आणि घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीची मागणी केली. येत्या तीन दिवसात शासनानं आणि आयोगानं मागण्या मान्य न केल्यास आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल, असा इशारा उपस्थित नेते, शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून देण्यात आला.