Asia

म्यानमारमधील रोहिंग्या निर्वासित चक्रीवादळातही उपेक्षित

राजकीय उत्पिडनाचा सामना करत असलेले म्यानमारमधील रोहिंग्या आता या नैसर्गिक आपत्तीलाही तोंड देत आहेत.

Credit : इंडी जर्नल

 

बंगालच्या उपसागरात तयार झालेलं गेल्या शतकातील सर्वात तीव्र चक्रीवादळ म्यानमार आणि बांग्लादेशच्या सीमाभागात रविवारी धडकलं. 'मोखा' असं नाव दिलेल्या या चक्रीवादळाचा म्यानमारच्या रखायन प्रांताला, तसंच बांग्लादेशमधील कॉक्सेस बझार जिल्ह्यालाही फटका बसला. या दोन्ही भागांमध्ये रोहिंग्या निर्वासितांच्या छावण्या आहेत. आधीच राजकीय उत्पिडनाचा सामना करत असलेले म्यानमारमधील रोहिंग्या आता या नैसर्गिक आपत्तीलाही तोंड देत आहेत.

म्यानमारमध्ये सध्या सत्तेत असलेल्या लष्करानं शुक्रवारी जारी केलेल्या पत्रकानुसार आत्तापर्यंत या चक्रीवादळात किमान १४५ जणांचा मृत्यू झाला आहे. यात ४ सैनिक, २४ "स्थानिक" तर ११७ "बंगाली" लोकांचा मृत्यू झाला असल्याचं ही आकडेवारी सांगते. म्यानमार लष्कराकडून देशातील रोहिंग्यांचा अपमानजनकरित्या बंगाली म्हणून उल्लेख केला जातो. मात्र प्रत्यक्षात या प्रदेशात अंतर्गत निर्वासित झालेल्या रोहिंग्या समूहातील लोकांची संख्या आणि त्यांच्या छावण्यांची झालेली वाताहत पाहता ही संख्या आणखी बरीच मोठी असण्याची शक्यता रोहिंग्या समूहासाठी काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटनांनी वर्तवली आहे. या भागातील लोकांनी समाज माध्यमांवर केलेल्या पोस्ट्सनुसार ४०० हुन अधिक रोहिंग्यांचा मोखामुळे मृत्यू झाला असल्याची शक्यता आहे. शेकडो लोक अजूनही बेपत्ता असल्यानं हा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. मात्र म्यानमार लष्करानं ही आकडेवारी नाकारली आहे.

२०१६-१७ मध्ये म्यानमारमधील रखायन प्रदेशात लष्कराकडून झालेल्या नरसंहारामुळं लाखो रोहिंग्या विस्थापित झाले. त्यातले काही रखायन प्रदेशातीलच सीमाभागात अंतर्गत निर्वासित म्हणून राहिले, तर अनेकांना सीमेपलीकडे बांग्लादेशमधील कॉक्सेस बझारला पलायन करावं लागलं. कॉक्सेस बझारमध्ये सध्या जगातील सर्वात मोठी निर्वासित वसाहत आहे. या दोन्ही प्रदेशांत मोठ्या संख्येनं रोहिंग्या निर्वासित राहतात, ज्यांना या वादळाचा मोठा फटका बसला आहे.

मोखा धडकण्यापूर्वी ते बांग्लादेशातील कॉक्सेस बझारमधील निर्वासित छावण्या असलेल्या भागात धडकू शकतं, असा अंदाज होता. बांग्लादेश सरकारनं आधीच इथं राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलं. त्यामुळं कॉक्सेस बझारमधील निर्वासितांचा जीव वाचला. मात्र त्यांच्या छावण्या, अनेकांच्या किनाऱ्याला लावलेल्या मच्छीमारीच्या बोटी वादळात उध्वस्त झाल्यानं त्यांना परतण्यासाठी घर किंवा उपजीविकेची साधनं शिल्लक राहिली नाही.

म्यानमारच्या रखायन प्रदेशातील रोहिंग्यांची परस्थिती याहूनही बिकट आहे. कॉक्सेस बझारमध्ये धडकण्याची संभावना असलेलं हे वादळ रखायन प्रदेशात येऊन धडकलं. या भागात अंतर्गत विस्थापित झालेल्या रोहिंग्यांच्या अनेक छावण्या आहेत ज्यात लाखो निर्वासित राहतात. रखायन प्रदेशाला चक्रीवादळाचा तडाखा बसणार याची सूचना असूनही म्यानमार लष्करानं वादळाच्या आधी तिथल्या छावण्यांमधून कोणालाही स्थलांतरित केलं नसल्याचं स्थानिक वृत्तं सांगतात. एवढंच नाही तर लष्करानं या छावण्यांमधील निर्वासितांना स्थलांतरित होण्यास मनाई केल्याचा आरोपही काही स्थानिकांनी केला. वादळामुळं पडझड होऊन अनेक छावण्या उध्वस्त तर झाल्याचं, काही ठिकाणी समुद्राची पातळी अचानक वाढल्यानं घरं आणि त्यातील लोक पाण्यात वाहूनही गेल्याचं समजतं.

 

 

मात्र चक्रीवादळ-बाधित रोहिंग्यांची संख्याच समोर न आल्यानं त्यांना या बिकट परिस्थितीत मदत मिळणं अत्यंत कठीण झालं आहे. लष्करानं या भागांत लादलेल्या निर्बंधांमुळं चक्रीवादळ बाधितांसाठी येणारी आंतरराष्ट्रीय मदतदेखील त्यांच्यापर्यंत पोहचत नसल्याचा आरोप म्यानमार लष्कराविरोधातील नॅशनल युनिटी गव्हर्नमेंटनं केला आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी रखायन प्रातांची राजधानी सिटवे शहराला भेट देऊन प्रांताची मदत जाहीर केली. मात्र अनेक वृत्तांनुसार अनेक छावण्यांमध्ये प्रत्यक्षात यातील काहीही मदत मिळाली नसल्याचं स्थानिक सांगतात.

सिटवे आणि त्याच्या आजूबाजूच्या गावांमधील रोहिंग्या छावण्यांची छायाचित्रं हृदयद्रावक आहेत. वादळातून बचावलेले लोक त्यांच्या उरल्या सुरल्या घरांमधून शक्य त्या वस्तू वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. कोणी त्यांच्या कुटुंबीयांना शोधतायत, तर कोणी मृतदेहांचे दफनविधी करताना दिसतायत. गेल्या पाच वर्षांत छावण्यांमध्ये पै-पै जमा करून जोडलेलं अनेकांचं आयुष्य पुन्हा एकदा उध्वस्त झालं आहे. मात्र काही निवडक माध्यम संस्था सोडता आंतरराष्ट्रीय स्तरावर मात्र याबद्दल संपूर्ण शांतता आहे.

फेब्रुवारी महिन्यात तुर्कीये आणि सिरीयाच्या सीमाभागात झालेल्या भूकंपानंतर तिथल्या निर्वासितांनाही अशाच प्रकारच्या उपेक्षेचा सामना करावा लागला होता. भूकंपानंतर तब्बल ४ दिवसांनी पहिल्यांदा सिरीयामधील भूकंपबाधित भागात संयुक्त राष्ट्रसंघाकडून मदत घेऊन जाणारे ट्र्क पोहचू शकले होते. सिरियाच्या बंडखोर लष्कराच्या ताब्यात असलेल्या भागातील अंतर्गत निर्वासित सिरीयन नागरिक, तसंच तुर्कीयेतील सीमाभागात आश्रित म्हणून राहत असलेले सिरीयन यांच्यासमोरील आव्हानांतही नैसर्गिक आपत्तीमुळं भर पडली होती. त्यावेळीदेखील आंतरराष्ट्रीय असंवेदनशीलतेवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.

आधीच दयनीय स्थितीत असलेल्या म्यानमार आणि बांग्लादेशमधील रोहिंग्या छावण्यांची परिस्थिती मोखा चक्रीवादळानं आणखीच बिघडली आहे. अजूनही पडणाऱ्या पावसामुळं कॉक्सेस बझारमधील घरांमध्ये परतणं तिथल्या निर्वासितांसाठी शक्य झालेलं नाही. जिल्ह्यातील अनेक भागांत भूस्खलनाचाही धोका निर्माण झाला आहे. अशीच काही परिस्थिती रखायन प्रातांत आहे.

 

 

गेल्या काही महिन्यांत बांग्लादेशमध्ये आलेल्या रोहिंग्या निर्वासितांच्या म्यानमारमध्ये परतण्याबाबत वाटाघाटी सुरु आहेत. या महिन्याच्या सुरवातीलाच बांग्लादेश सरकार आणि म्यानमार लष्कर यांनी एकत्रितपणे २० रोहिंग्या निर्वासितांना रखायन प्रांतातील पुनर्वसन छावण्या बघण्यासाठी नेलं. या उपक्रमाची सुरवात म्हणून १,१०० रोहिंग्यांचं म्यानमारमध्ये पुनर्वसन करण्याची योजना आहे. मात्र या छावण्यांना भेट देणाऱ्या रोहिंग्यांनी त्या डिटेन्शन सेन्टर्ससारख्या असल्याचं सांगितलं. तसंच त्यांना पूर्ण नागरिकत्व मिळणार नसल्यानं सध्या तरी म्यानमारमध्ये परतणं रोहिंग्या निर्वासितांसाठी हितकारक नसल्याचंही त्यांनी म्हटलं. 

त्यानंतर आलेल्या या नैसर्गिक आपत्तीत म्यानमारमधील अंतर्गत निर्वासित रोहिंग्यांना मिळालेली वागणिक पाहता इतक्यात तरी देशविहीन रोहिंग्यांना स्वदेशी परतणं सुरक्षित नाही, हेच सिद्ध होतं. मात्र जरी बांग्लादेश सरकार रोहिंग्या निर्वासितांना परतण्याची सक्ती करत नसलं, तरी गेल्या ५-६ वर्षांत त्यांच्यावर शिक्षणापासून उपजिविकेपर्यंत अनेक बाबतीत निर्बंध लादण्यात आले आहेत. बांग्लादेशनं अनेक रोहिंग्या निर्वासितांची भासन चार या दुर्गम बेटावर रवानगीही केली आहे.

त्यामुळं बांग्लादेशमधूनही पलायन करून अनेक रोहिंग्या समुद्रमार्गे इंडोनेशिया आणि मलेशियाला पोहोचण्याचा प्रयत्न करतात. २०२२ मध्ये म्यानमार आणि बांग्लादेशमधून किमान ३,५०० रोहिंग्यांनी समुद्रमार्गे स्थलांतर करण्याचा प्रयत्न केला. प्रतिकूल समुद्री हवामान, बोटींवरील गर्दी, अवैध स्थलांतरादरम्यान अनेक दिवस समुद्रावर राहावं लागल्यानं झालेली उपासमार, आजारपणं, बोटींचे अपघात अशा कारणांमुळं अनेकांचा या प्रयत्नांदरम्यान जीव जातो. कित्येक मुलं त्यांच्या पालकांपासून दूर होतात, अनेकजण मानवी तस्करीच्या जाळ्यात अडकतात. भारतात पळून आलेल्या रोहिंग्यांना तर दररोज असुरक्षितता आणि म्यानमारमध्ये परतावं लागण्याच्या भीतीत जगावं लागतं.

आधीच अशा संकटांचा दैनंदित जीवनात सामना करत असणाऱ्या रोहिंग्यांसमोर आता या नैसर्गिक आपत्तीनं अजून मोठं आव्हान उभं केलं आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळं जरी नवीन नसली, तरी कॅटेगरी ५ वादळ असलेल्या मोका चक्रीवादळाच्या तीव्रतेमागे हवामानबदल एक कारण नक्कीच असल्याचं तज्ञांनी म्हटलं आहे. जगभरात बऱ्याच निर्वासित वसाहती हवामानबदलाचा जास्त प्रभाव असणाऱ्या क्षेत्रांत आहेत. यामुळं हवामानबदलामुळं निर्माण होणाऱ्या परिस्थितीमुळं त्यांच्यासमोर पुन्हा एका विस्थापनाचं संकट निर्माण होण्याची शक्यता संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्वासितांसाठी काम करणाऱ्या संघटनेनं व्यक्त केली आहे. म्यानमारमधील देशविहीन रोहिंग्यांना आता हवामानबदलही निर्वासित होण्यास भाग पाडेल का?