Opinion
या पार्थाचे श्रीकृष्ण आहेत तरी कोण?
मीडिया लाईन सदर
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया’ या कंपनीच्या पुण्यातील मुंढवा येथील जमीन व्यवहाराच्या खरेदीखतामध्ये जमिनीच्या मालकीचा पुरावा, मोबदला, पॉवर ऑफ ॲटर्नी, बाजारमूल्य आणि मुद्रांक शुल्काचा उल्लेख नाही. तरीदेखील सातबारा उताऱ्यावर नोंद केल्याचे माहितीच्या अधिकारात मिळालेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट होत असल्याचा दावा आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. ही शेतजमीन असल्याने कंपनीला ती खरेदी करता येत नाही, तरीही तसा व्यवहार करण्यात आला, असेही कुंभार यांनी म्हटले आहे. तसेच पार्थ यांनी या व्यवहारासाठी भागीदार दिग्विजय पाटील यांना ‘अधिकृत’ करण्यासाठी स्वाक्षरी केलेली पॉवर ऑफ ॲटर्नी तसेच संबंधित जमिनीवर आयटी पार्क उभारण्यासंबंधीचा ठराव हा स्वतः सही करून मंजूर केला आहे. याचा अर्थ, ते या व्यवहाराच्या निर्णयप्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी आहेत, असे कुंभार यांचे म्हणणे आहे. कुंभार हे अत्यंत तळमळीने आरटीआय क्षेत्रात काम करत आहेत. त्यामुळे या सगळ्या गैरव्यवहारातून पार्थ यांना आपल्या जबाबदारीतून मुक्त होता येणार नाही, असेच एकूण दिसते.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर अजितदादा हे या घोटाळ्यामुळे अडचणीत आलेले आहेत. परंतु ‘अगोदर मला या व्यवहाराची कुणकुण होती’, असे म्हणणाऱ्या अजितदादांनी दुसऱ्याच दिवशी ‘मला या व्यवहाराची काहीही माहिती नव्हती’, असे सांगायला सुरुवात केली... तसेच या व्यवहारात एका पैशाचाही व्यवहार झाला नाही, असाही युक्तिवाद केला. पुण्यातील जमीन खरेदी व्यवहार प्रकरणात महार वतनाची १८०० कोटी रुपयांची जमीन पार्थ यांनी ३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याचा आरोप झाला. सदर प्रकरण गंभीर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले. परंतु लगेचच अजितदादा हे अशा कुठल्याही प्रकारला पाठीशी घालतील, असे वाटत नाही असे उद्गारदेखील त्यांनी काढले. तेव्हाच दादांना अडचणीत आणून केवळ आपल्या दबावाखाली आणायचे, हाच यामागील भाजपचा डाव असल्याचे स्पष्ट झाले. दादांवर व पार्थवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, हेही सूचित झाले. यासंबंधी महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे, ‘ते अतिशय चांगले अधिकारी आहेत’, असे सर्टिफिकेट खुद्द दादांनीच दिले आहे! वास्तविक पार्थ यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप झाल्यानंतर, या विषयासंबंधी कोणतेही भाष्य न करता अजितदादांनी राजीनामा देणे आवश्यक होते. परंतु ते उलट खारगे यांचे कौतुक करत बसले आहेत. याचा अर्थ लोकांना कळत नाही, असे नाही...
महायुतीतील नेते व मंत्र्यांबद्दल सतत आरोप करणारे रोहित, हे पार्थ प्रकरण बाहेर आल्यानंतर सुरुवातीला मौन बाळगून होते.
खारगे हे यापूर्वी सांस्कृतिक कार्य विभागाच्या अप्पर मुख्य सचिव पदाचा कार्यभार सांभाळत होते. परंतु ३१ जुलै रोजी त्यांची महसूल खात्यात बदली करण्यात आली. ते फडणवीसांच्या विश्वासातील अधिकारी आहेत. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांचे उपोषण यांनी हाताळले, ते जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची बदली एकनाथ शिंदे यांचा जिल्हा असलेल्या ठाण्यात करण्यात आली आहे. तेदेखील फडणवीस यांच्या जवळचे अधिकारी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासातील अधिकारी केंद्रातील मंत्र्यांवर लक्ष ठेवून त्यांच्या उद्योगांची माहिती मोदी यांना देतात, हाच फॉर्म्युला फडणवीस यांनी राबवला आहे. अजितदादा आणि शिंदे यांच्यावर ते आपले अधिकाऱ्यांमार्फत नजर ठेवत असतात.
पुणे जमीन घोटाळा समोर आल्यानंतर ‘मी पार्थशी बोलले. तो असं काही करणार नाही’, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिली. महिला अनेकदा भावनिक होतात, म्हणून त्यांनी तशी प्रतिक्रिया दिली असेल असे आमदार रोहित पवार म्हणाले! नेहमी महायुतीतील वेगवेगळे नेते व मंत्र्यांबद्दल सतत आरोप करणारे रोहित, हे पार्थ प्रकरण बाहेर आल्यानंतर सुरुवातीला मौन बाळगून होते. एरवी नको त्या विषयावर ज्ञान पाजणारे रोहित आता कुठे आहेत, असा प्रश्न सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी उपस्थित केला. मात्र माझी प्रकृती ठीक नसल्यामुळे मी बोललो नव्हतो असा खुलासा रोहित यांनी केला. त्याचबरोबर कुणी जर बेकायदेशीर काम करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. खरे आणि खोटे काय, हेही जनतेसमोर आले पाहिजे अशी गुळमुळीत प्रतिक्रिया त्यांनी दिली. परंतु रोहित यांनी कागदपत्रे मिळवून पार्थवर कोणतेही आरोप केले नाहीत. अन्य नेत्यांबाबत मात्र ते नेहमी कागदपत्रे गोळा करत असतात.
नेहमीच रोखठोक भूमिका न घेता संदिग्ध स्वरूपाची वक्तव्य करणे, ही शरद पवार यांची खासियत आहे.
भाजपला कुबड्यांची गरज नाही, त्यामुळे कुबड्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे, असे वक्तव्य करून रोहित यांनी एक प्रकारे अजितदादा व पार्थ यांच्या बद्दलची आपली भूमिका सौम्य असल्याचे दाखवून दिले. अकोल्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत साहेब, म्हणजेच शरद पवार म्हणाले की, पार्थ यांच्यावर गुन्हा का दाखल झाला नाही, या प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्रीच देऊ शकतील. या प्रकरणाची त्यांनी चौकशी करायला हवी. चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे, असे मत पवार यांनी व्यक्त केले.
नेहमीच रोखठोक भूमिका न घेता संदिग्ध स्वरूपाची वक्तव्य करणे, ही शरद पवार यांची खासियत आहे. वास्तविक या भ्रष्टाचाराविरोधात राज्यभर आंदोलन करा, असा आदेश त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना द्यायला हवा होता. एरवी पुण्यात भाजपविरोधात बालगंधर्व रंगमंदिरासमोर नेहमी आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पुण्याच्या कार्यकर्त्यांनादेखील साहेबांनी शांत राहण्याचा आदेश दिला का, हे कळायला मार्ग नाही. गेल्या वर्षी निवडणूक प्रचारात भाग घेताना अजितदादा हे ‘हा कारखाना कसा काय चालतो, हेच मी पाहतो. अमुक माणूस निवडून कसा येतो, हे मी बघतो’, अशाप्रकारे दमबाजी करतात. यावर साहेबांनी टीका केली होती. एवढेच नव्हे, तर अजितदादांच्या जाहीर सभेमध्ये डोळ्यातून टिपे काढण्याच्या प्रसंगाची साहेबांनी नक्कलही करून दाखवली होती. परंतु इतक्या गंभीर प्रकरणात शरद पवार, सुप्रियाताई, रोहित पवार हे मुळमुळीत भूमिका घेत आहेत आणि राज्यापेक्षा कुटुंब महत्वाचे, हीच आपली भूमिका असल्याचे दाखवून देत आहेत. याला काही अर्थ नाही.
महाविकास आघाडीचा एक भाग म्हणून शरद पवार यांनी अशा प्रकारच्या गैरव्यवहाराविरुद्ध ठाम भूमिका घेणे आवश्यक होते.
महायुतीमधील अंतर्गत राजकारणाचा भाग म्हणून अजितदादांना अडचणीत आणण्यात येत असेल. परंतु तो मुद्दा वेगळा आहे. महाविकास आघाडीचा एक भाग म्हणून शरद पवार यांनी अजित दादांच्या पक्षाविरुद्ध आणि अशा प्रकारच्या गैरव्यवहाराविरुद्ध ठाम भूमिका घेणे आवश्यक होते. यापूर्वी सुशांतसिंग राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी पार्थ यांनी केली होती, तेव्हा त्याच्या मताला मी कवडीचीही किंमत देत नाही, अशे पार्थचे आजोबा, म्हणजेच साहेब म्हणाले होते. अयोध्येच्या राम मंदिराबाबतही पार्थने भाजपचा कार्यकर्ता असल्याप्रमाणे मत व्यक्त केले होते. ‘पहाटेच्या शपथविधी’ला पार्थ हजर होता आणि दादांनी साहेबांकडे परत जाऊ नये, असे त्याचे मत होते, असे म्हणतात. आता तर पार्थला उपदेश करण्यासाठी श्रीकृष्ण, म्हणजे फडणवीस आहेतच, असे साहेबांचे क्रिकेटमधील सहकारी आणि भाजप नेते आशीष शेलार यांनी म्हटले आहे.
२०१४ मध्ये फडणवीस सरकारने पाठिंबा मागितला नसताना, राष्ट्रवादी काँग्रेसने तो दिला होता. त्यानंतरच्या काळातही फडणवीस सरकारविरोधात एकसंध राष्ट्रपती काँग्रेसने कधीही खणखणीत आंदोलने केली नाहीत. आधी आपण काही केले, तर आपल्या पांघरूण घालायला साहेब असायचे. मात्र आता आपल्यालाच आपल्यावर पांघरूण घालावे लागत आहे, असे वक्तव्य करत सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस अजितदादांनी शरद पवार यांची आठवण काढली होती. पुण्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी हे उद्गार काढले होते. परंतु आता काका म्हणजे शरद पवार पार्थ प्रकरणात अजितदादा व पार्थवर पांघरूण घालणार आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अजितदादा, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ अशा पक्षातील नेत्यांच्या कथित भ्रष्टाचाराविरोधात शरद पवारांनी कधीही जाहीरपणे आक्रमक भूमिका घेतली नाही. ज्यावेळी पक्ष फुटला, तेव्हा या मंडळींनी भ्रष्टाचार केला असेल, तर त्याची चौकशी करा. त्यांनी गैरव्यवहार केला असे आम्ही म्हणत नव्हतो, तुम्हीच म्हणत होता. आता तुम्हीच त्याची चौकशी करा, अशी भूमिका शरद पवार आणि सुप्रियाताईंनी घेतली होती. जेव्हा आपले सहकारी नाना उपद्व्याप करत होते, तेव्हा त्याकडे साहेबांनी दुर्लक्ष केले. पांघरूण घालण्याच्या या उद्योगामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसची विश्वासार्हता निर्माणच होऊ शकली नाही, या गोष्टीचे कधीतरी परीक्षण केले जाणार का, हाच खरा प्रश्न आहे.
