India
आमदार संजय गायकवाड यांच्या अटकेच्या मागणीसाठी कोथरूड पोलीस स्थानकासमोर आंदोलन
गायकवाड यांना अटक करा, नाहीतर पंडित यांना सोडा, अशी मागणी आंदोलक करत आहेत.
कोथरूड पोलीस स्टेशन येथे मास मुव्हमेन्ट या संघटनेचे ८-१० कार्यकर्ते शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या अटकेची मागणी करत उपोषण करत आहेत. जिथं एकीकडे कन्टेन्ट क्रिएटर संतोष पंडित यांना त्यांच्या एका रीलमध्ये त्यांनी एक तथाकथित आक्षेपार्ह शब्द वापरल्याबद्दल अटक झाली, तिथं प्रकाश आंबी यांना फोनवर शिवीगाळ केल्याबद्दल गायकवाड यांना अटक का केली गेली नाही, असा प्रश्न आंदोलनकर्त्यांनी विचारला आहे. एक तर गायकवाड यांना अटक करा, नाहीतर पंडित यांना सोडा, अशी मागणी आंदोलक करत आहेत. शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी पोलीस स्थानकाला भेट देऊन पंडित यांच्या सुटकेची मागणी केली.
काही दिवसांपूर्वी समाज माध्यमावर पुणे शहरातील रस्त्याच्या व्यवस्था, इतर नगरी समस्या आणि सरकारवर टीका करणारे व्हिडीयो बनवणाऱ्या संतोष पंडित यांच्यावर एका महिलेनं विनयभंगाचा आरोप केला. पंडित यांनी त्यांच्या व्हिडियोमध्ये वापरलेल्या एका तथाकथित आक्षेपार्ह शब्दामुळं भावना दुखावल्या असल्याचा आरोप करत त्या महिलेनं कोथरूड पोलीस स्थानकात तक्रार केल्यानंतर रात्री १ वाजता पोलिसांनी पंडित यांना अटक केली.
कोथरूड पोलीस ठाण्याबाहेर उपोषणास बसलेले मास मुव्हमेन्ट संघटनेचे अध्यक्ष भाई जगताप सांगतात, "संतोष पंडित हे पुणे शहरात चांगलं काम करत आहेत. पण एका महिलेमुळे कोथरूडच्या आमदार चंद्रकांत पाटील यांनी ताकद लावून एका सामाजिक कार्यकर्त्याचा बळी दिला आहे. संतोष पंडित यांच्यावरील गुन्हा मागे घेऊन त्यांना सोडून देण्यासाठी आणि बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आम्ही आज इथं उपोषण करत आहोत."

काही महिन्यांपूर्वी आमदार संजय गायकवाड यांनी ३७ वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकावर आक्षेप घेत ते प्रकाशित करणाऱ्या प्रशांत आंबी यांना फोनवर धमकी देत शिवीगाळ केली होती, ज्याचं रेकॉर्डिंगदेखील उपलब्ध आहे.
"संविधान सगळ्यांना सामान हक्क देतं. मग एकाला वेगळा न्याय आणि दुसऱ्याला वेगळा का? आम्हाला १०० टक्के खात्री आहे की आमदार चंद्रकात पाटील यांचा यात हात आहे, कारण संतोष पंडित त्यांच्याविरोधात बोलले होते. त्यांना अटक होताना पोलिसांसोबत भाजप कार्यकर्तेदेखील तिथं उपस्थित होते," भाई जगताप पुढं म्हणतात.
याचबद्दल बोलताना आंदोलनकर्ते निहार भोवले म्हणाले, ""मोठमोठे मंत्रीदेखील भाषणात शिव्यांचा आणि घाण भाषेचा प्रयोग करतात. पण त्यांच्यावर कारवाई कधीच होत नाही. पण संतोष पंडित जे सामान्य माणूस असल्यानं आणि भाजप सरकारच्या विरोधात बोलल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्यातील मोठमोठ्या गुंडांवरही इतक्या लवकर आणि इतकी कठोर कारवाई केली जात नाही. पण सामान्य माणूस जेव्हा रस्त्यावर उतरून प्रशासनाला प्रश्न विचारतो, तेव्हा त्याच्यावर गुन्हा दाखल केला जातो."
ते पुढं म्हणाले, “आमच्या संघटनेतील सोनालीताई कांबळे गेले ३-४ दिवस कोथरूड पोलीस स्थानकाला येऊन अर्ज दाखल करत होत्या, ज्यामध्ये जर संतोष पंडितांवर गुन्हा दाखल केला आहे तर त्याच कारणानं आमदार संजय गायकवाड यांच्यावर देखील गुन्हा दाखल करा, असं त्या म्हणत होत्या. पण त्यांच्या अर्जाकडं लक्ष दिल जात नाहीये. आज करू उद्या करू असं सांगून ते लांबणीवर टाकलं जातंय. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. ही तानशाही आणि हुकूमशाही आहे.”
रोहित पवार यांची भेट
आमदार रोहित पवार यांनीदेखील आज पुण्यात सुरु असलेल्या या आंदोलनाला भेट दिली, तसंच पोलिसांकडे संतोष पंडित यांच्या सुटकेची मागणी केली.
कर्तव्यदक्ष, अतितत्पर आणि गुन्हा दाखल होताच तासाभरात अगदी रात्री १ वाजता ज्या कोथरूड पोलिसांनी भाजपच्या भाषेत ‘अर्बन नक्षल’ संतोष पंडित यांना अटक केली, त्याच कोथरूड पोलीस ठाण्यात जीवे मारण्याची धमकी आणि आई-बहिणीवरून शिवीगाळ करणाऱ्या आमदाराविरोधात खरा गुन्हा दाखल करण्यासाठी…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 11, 2026
"आमदार गायकवाड यांनी प्रशांतला फोन करून त्यांच्या बायकोवर सामूहिक बलात्काराच्या धमक्या दिल्या. महिलांसाठी आक्षेपार्ह भाषा वापरली. खुनाच्या धमक्या दिल्या. आज त्यांच्या बायको आरती इथं उपस्थित आहेत आणि त्यांनीच कोथरूडला येऊन संजय गायकवाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी विनंती केली आहे,” पवार म्हणाले.
पंडित यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, “संतोष पंडितांनी एक व्हिडीओ करून त्यात एकच शब्द वापरला. शब्द चुकीचा असला तरी तो महिलांबद्दल नव्हता. संतोष पंडितांना अटक झाल्याचं समजताच आरती आंबीदेखील इथं न्यायासाठी आल्या, पण त्यांना पोलिसांनी सांगितलं की आम्ही तुमची तक्रार घेऊ शकत नाही. सोनाली कांबळे यांनीदेखील तक्रार करण्याचा प्रयत्न केला पण त्यांची तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही. यांच्यावर गृह खात्याचा दबाव आहे कारण संतोष पंडित सरकार विरोधात आवाज उठवत होते. इथं संविधानाची पायमल्ली झाली आहे. या ताईंना न्याय मिळालाच पाहिजे."
प्रकाशक प्रशांत आंबी आणि आरती आंबी पोलीस स्थानकात उपस्थित
“संतोष पंडितांवर जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हा मला खरोखर वाटलं की आपल्या महाराष्ट्रात महिलांचा सन्मान होतोय. मला बलात्काराच्या धमक्या दिल्या गेल्या. मी स्वतः तक्रार करण्याचा प्रयत्न केला पण माझी तक्रार घेतली जात नाहीये. मला असं म्हणलं जातंय की मी तुम्हाला लेखी कळवतो. जर असंवैधानिक शब्द बोलल्या गेल्यानंतर एखाद्या स्त्रीच्या भावना दुखून दखलपात्र गुन्हा दाखल होत असेल, तर मी तर या धमक्या स्वतः ऐकल्या आहेत. तरीसुद्धा पोलीस तक्रार दाखल करून का घेत नाहीयेत? सर्वसामान्यांना यांनी स्पष्टपणे सांगावं की पोलीस प्रशासन शासनाच्या दबावाखाली काम करत आहे,” आरती आंबी म्हणाल्या.
“मला धमकीचा फोन येऊन आज १४४ दिवस झाले आहेत, तरी आजपर्यंत संजय गायकवाडांवर तक्रार दाखल झाली नाही. एवढंच नाही तर संजय गायकवाडांच्या कार्यकर्त्यांनीदेखील आम्हाला खुनाच्या धमक्या दिल्या आहेत. परवापर्यंत मला खुनाची धमकी येत होती. आमची जिल्हा न्यायालयात लढाई सुरु आहे,” असं प्रकाशक प्रशांत आंबी म्हणाले.
