India
एमपीएससी आंदोलनाला पोलिसांच्या नोटीशी?
आंदोलन ‘बेकायदेशीर’ म्हणत विद्यार्थी, क्लासेसना पत्रव्यवहार.
गेल्या ६ दिवसांपासून पुण्यात आंदोलन करत असलेल्या महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन 'गैरकायदेशीर' आहे, असं म्हणत पुणे पोलिसांनी त्यांना नोटीशी पाठवायला सुरुवात केली आहे. १ ऑक्टोबरच्या रात्रीपासून पुण्यातील एस एम जोशी मार्गावर शेकडो एमपीएससीचे विद्यार्थी एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांचा राजीनामा तसंच आयोगाच्या कार्यवाहीत पारदर्शकतेचा मागणी करत आंदोलन करत आहेत. यातील ६ जण गेल्या तीन दिवसांपासून उपोषण करत आहेत. मात्र गेल्या दोन दिवसांपासून विद्यार्थी तसंच त्यांच्या शिकवण्या घेणाऱ्या शिक्षकांना विश्रामबाग पोलीस स्थानकातून नोटीशी येत आहेत.
उपोषणास बसलेले आंदोलक विद्यार्थी नितीन गित्ते सांगतात, “पोलिस वारंवार नोटीस पाठवत आहेत. मी गेले ३ दिवस उपोषण करत आहे आणि आतापर्यंत मला तीन नोटीशी आल्या आहेत. माझं म्हणणं आहे की सरकार जर सरळ मार्गानं आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार देत नसेल, तर आम्हाला हा मार्ग शेवटी अवलंबवावाच लागेल. मी सगळे विचार सोडून दिले आहेत. सरकारनं मला नोटीस पाठवल्या काय, फासावर चढवलं काय किंवा गोळ्या जरी झाडल्या तरी मला फरक पडत नाही. कारण जोपर्यंत भिमनवारांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणावरून उठणार नाही.”
.jpeg)
३० सप्टेंबर रोजी आंदोलक विद्यार्थ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्यानंतर २ ऑकटोबरला होणाऱ्या आंदोलनाला आधी स्थगिती देण्यात आली होती. मात्र आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याबद्दल स्पष्टता न मिळाल्यानं २ ऑकटोबरपासून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी एस एम जोशी मार्गावर भिमानवारांच्या राजीनाम्यची मागणी करत आंदोलन सुरु केलं. यात युथ काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे आणि त्यांच्यासोबत प्रियंका चौधरी, ऋषिकेश गांगुर्डे, नितीन गित्ते, सोमनाथ चव्हाण आणि गजानन शेळके हे विद्यार्थी उपोषणास बसले आहेत. आंदोलन आणखी पेटायला लागल्यानंतर पोलिसांनी "२ ऑकटोबरला होणाऱ्या आंदोलनाला आधी परवानगी दिली होती परंतु मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर ते आंदोलन स्थगित करण्यात आलं होतं, ज्यामुळे आधी दिलेल्या परवानगीचे आदेश रद्द झाले आणि आता सुरु असलेल्या आंदोलनाला परवानगी नाही" अशा नोटीसही पोलिसांनी पाठवायला सुरुवात केली.
“सुरुवातीला पोलिसांनी आमच्याकडे येऊन आम्हाला हे आंदोलन बेकायदेशीर आहे आणि ते सुरु राहिल्यास आमच्यावर कारवाई केली जाईल, असं सांगितलं. तेव्हा रोहित दादांनी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की परत जर पोरांना धमक्या दिल्या तर मी हाच मोर्चा पोलीस आयुक्तांच्या कार्यालयावर घेऊन येईन. त्यानंतर त्यांनी ऑनलाईन नोटीस पाठवल्या,” गित्ते म्हणाले.

आंदोलन करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आल्याचं आंदोलक सांगतात, मात्र नक्की आकडा स्पष्ट होऊ शकला नाही. हिंदुस्तान टाइम्सनं केलेल्या एका बातमीनुसार आतापर्यंत ५१ विद्यार्थी पोलिसांच्या नोटीस आलेल्या आहेत. मात्र यातील नोटीस मिळालेल्या विद्यार्थ्यांचे आकडे इंडी जर्नलला स्वतंत्रपणे सत्यापित करता आलेले नाही. मात्र पाहिलेल्या एका नोटीसमध्ये २९ विद्यार्थ्यांची नावं आहेत.
याचबरोबर उपोषणास बसलेला सोमनाथ चव्हाण सांगतो, “मला दोन दिवसापूर्वी नोटीस आली. आम्हाला सांगितलं आंदोलन केलं तर कारवाई होईल. आम्ही स्वतःच्या हक्कासाठी लढतोय. आम्ही आता कुठल्याच कारवाईला भीत नाही. पारदर्शक परीक्षेसाठी आम्ही अशा कितीही केसेस अंगावर घ्यायला तयार आहोत. जर आम्ही अशा कारवायांना भिलो तर लढणार कोण? जसं स्वत्र्यांत्यासाठी अनेक लोक लढले, असा आम्हीपण थोडा तरी त्याग करायलाच हवा. मी पण गेले ३ दिवस झालं उपोषण करतोय आणि भिमनवारांचा राजीनामा घेतल्याशिवाय इथून आम्ही उठणार नाही.”
पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी शिकवण्या घेणारे शिक्षक डॉ. अजित काकडे यांच्यासह इतर २९ शिक्षकांनाही पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आल्या आहेत. शिक्षकांना पाठवलेल्या नोटिशींमध्ये विशेष म्हणजे टेलिग्राम या ऍपवरील चॅनेलमार्फत आंदोलनाविषयी तथाकथित भडकाऊ संदेश पाठवल्याचे आरोप करण्यात आले असून नियमांचं पालन न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. इंडी जर्नलनं पाहिलेल्या नोटिशीत ३३ क्लास चालकांची नावं आहेत.

“आम्हाला पोलिसांनी नोटीसद्वारे टेलिग्राम चॅनेलद्वारे कुठल्याही प्रकारे आंदोलनाला येण्याचं आवाहन करू नका, अशी चेतावणी दिली आहे. तसंच आंदोलनाबाबत कोणतंही वक्तव्य करू नये, असंही सांगितलं आहे. जर असं केलं तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असं नोटीसद्वारे बजावण्यात आलं आहे. आतापर्यंत मला सात ते आठ वेळा नोटीस आली आहे,” अजित काकडे सांगतात.
“पोलिसांना आमचं एवढंच म्हणणं आहे की विद्यार्थ्यांना समजून घ्या. जर तुमचे पेपर फुटले असते तर तुम्हीही आज या पदांवर नसता. शासनाला जागं करण्यासाठी विद्यार्थ्यांना इथं जमावं लागत आहे. माझं शासनाला एवढंच म्हणणं आहे की शासनानं विद्यार्थ्यांना दाब-दडप करण्याचा प्रयत्न करू नये. कुठल्याही देशाची ताकत ही तिथल्या युवकांमध्ये असते. जेव्हा जेव्हा विद्यार्थ्यांचा रोष एकत्र आला आहे, तेव्हा तेव्हा खूप मोठी उलथापालथ झालेली आहे. त्यामुळे शासनानं विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिलं पाहिजे. जोपर्यंत शासन मागण्या मान्य करत नाहीत, तोपर्यंत विद्यार्थी मागे हटणार नाही,” काकडे पुढं म्हणाले.
आंदोलनात सहभागी झालेले अक्षय कांबळे यांना आतापर्यंत ६ वेळा नोटीस आल्या आहेत. ते म्हणाले, "पोलिसांचं म्हणणं आहे की आम्ही प्रतिबंधित ठिकाणी अनधिकृतपणे आंदोलन करत आहोत. पोलिसांनी आधी आम्हाला परवानगी दिली होती. पण पुन्हा परवानगी नाकारल्याचं त्यांचं पत्र आलं. हे चुकीचं आहे. हे आमच्या संविधानिक हक्कांविरूद्ध आहे. आम्ही आमचा आवाज सरकार पर्यंत पोहोचवत आहोत. पण सरकार त्यावर कारवाई करायला तयार नाही. गेली सहा दिवस आम्ही इथं बसलो आहोत, तरीही आमचं ऐकायला कुणी तयार नाही.”
कांबळे पुढं म्हणाले, “आम्ही हे स्थान निवडण्यामागे आमचा उद्देश हाच होता की कुठल्याही नागरिकाला त्रास होणार नाही. याच्या एका बाजूला स्मशानभूमी आहे आणि हा पूलदेखील काही मुख्य रस्ता नाहीये. आम्ही एवढी काळजी घेत असतानादेखील जर तुम्ही अशा पद्धतीनं परवानगी नाकारत असाल, ते हे संविधानाच्या विरोधात आहे. जर अशाच विद्यार्थ्यांवर तुम्ही कारवाई करत राहिला तर या आंदोलनाचं स्वरूप आणखीन तीव्र होईल आणि आतातरी आम्ही भीमनवारांचा राजीनामा मागतोय जर केसेस वगैरे दाखल झाल्या तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील राजीनामा मागण्यास विद्यार्थी मागे पुढे पाहणार नाहीत.”

पाठवलेल्या नोटिशींसंदर्भात पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांना विचारलं असता त्यांनी इंडी जर्नलला सांगितलं, “आम्ही आंदोलनाला परवानगी दिलेली नाही. २ ऑकटोबरला होणाऱ्या आंदोलनाला आधी परवानगी दिली होती. पण मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर ते आंदोलन स्थगित करण्यात आलं होत. आंदोलन स्थगित करणार असल्याचं पत्रदेखील त्यांनी आम्हाला दिलं होत. म्हणून नंतर झालेल्या आंदोलनाला ती परवानगी लागू होत नाही आणि आम्ही पुन्हा परवानगी दिलेली सुद्धा नाही. बेकायदेशीर आंदोलन सुरूच राहिलं तर काय कारवाई करायची हे लवकरच ठरवलं जाईल.”
किती विद्यार्थ्यांना नोटीशी दिल्या आहेत, हे विचारलं असता जगताप यांनी "भरपूर जणांना नोटीस पाठवली आहे," असं सांगितलं.
दरम्यान विद्यार्थी आंदोलन सुरूच आहे. आतापर्यंत आंदोलन स्थळी अभिजित दिपके, सतेज पाटील, संजय राऊत, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, सुषमा अंधारे, अनिल देशमुख, विजय वडेट्टीवार, राज ठाकरे, ओमराजे निंबाळकर, राजू शेट्टी, मनोज जरांगे पाटील, यांसारखे नेते भेट देऊन गेले आहेत. मंगळवारी रात्री अमोल कोल्हेदेखील आंदोलनस्थळी भेट देणार आहेत. आज आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांची प्रतिकृती तिरडीला बांधून प्रतीकात्मक अंत्यसंस्कार केले.
